पोलीस असल्याची बतावणी करून खंडणी घेतल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पोलीस असल्याचे भासवून गुटखा विक्रेत्यांकडून जबरदस्तीने पैसे घेणा-या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ही कारवाई काल (24 फेब्रुवारी) सिंहगड कॉलेजच्या परिसरात करण्यात आली.

 

रामधन संदीपान गिलबिले (वय-30, रा.आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) आणि दीपक भिलाजी आळणी (वय-50, रा.सोमवार पेठ, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे पथकातील पोलीस कर्मचारी बाबासाहेब नरळे यांना सिंहगड कॉलेज परिसरात दोन व्यक्ती पोलीस असल्याच्या नावाखाली गुटखा विक्रेत्यांकडून पैसे वसूल करत असल्याची बातमी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वरील आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता 10 हजार रुपये सापडले.

 

पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. यातील दुसरा आरोपी दीपक आळणे याने पोलीस असल्याचे भासवून पानटपरी चालक मोहनलाल बोराणा यांच्याकडून 10 हजार रुपये घेतले. या प्रकरणी बोराणा यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शेखर शिंदे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.