पुणे, अकोला, मुंबई निवडणुकांमध्ये भाजपने वेगळी चीप वापरली – प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज – पुणे, अकोला आणि मुंबई या ठिकाणी झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये इव्हीएम मशीनमध्ये वेगळी चीप वापरण्यात आली असून ग्रामीण भागात भाजपचे अस्तित्व नसल्याने त्यांनी शहरी भागात इव्हीएम मशीनमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात एका कार्यक्रमा प्रसंगी केला. तसेच निवडणूक आयोगाने यामध्ये लक्ष देण्याची गरज असून प्रभागपद्धतीने झालेल्या निवडणुका घटनाबाह्य असल्याचे सांगत या निवडणुका रद्द कराव्या, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

 

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी इव्हीएम मशीनमध्ये गैरप्रकार केला जातो. यावर याचिका दाखल केली होती. 2013 साली सर्वोच्च न्यायालयाने इव्हीएममध्ये गैरप्रकार करता येणे शक्य असल्याचा निकाल दिला होता. त्याचबरोबर निवडणूक आयोगाला त्याची योग्य ती अंमलबजावणी करण्याचा आदेशही दिला होता. मात्र, निवडणूक आयोगाने याची अंमलबजावणी केली गेली नाही, असा आरोप करीत ते पुढे म्हणाले की, अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राने इव्हीएममध्ये गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याने बॅलेट पेपरचा निवडणुकीत वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

मात्र, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात इव्हीएम मशीनचा गैरप्रकार होत असल्याचे समोर आले असतानाही निवडणूक आयोग त्यांच्या बाजूने का आहे हे समजत नाही, असा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.