मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे दोघे गजाआड

वाकड पोलिसांची कामगिरी; पाच दुचाकी, एक रिक्षा जप्त
एमपीसी न्यूज – मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणा-या एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला वाकड पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई रविवारी (दि.5) रात्री साडेनऊच्या सुमारास थेरगाव येथे करण्यात आली.
अमोल नारायण सूर्यवंशी (वय 22) आणि श्रीकांत मलकाप्पा नडगेरी (वय 24, दोघे रा. बोडकेवाडी, माण), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वाकड पोलीस रविवारी हद्दीत गस्त घालत होते. दुचाकी चोरी करणारे आरोपी अमोल आणि श्रीकांत थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराजवळ येणार असल्याची माहिती वाकड पोलिसांना खब-यामार्फत मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दुचाकी चोरीविषयी विचारणा केली असता मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरत असल्याची आरोपींनी कबूली दिल्याचे, पोलिसांनी सांगितले.
अमोल सूर्यवंशी हा सराईत गुन्हेगार असल्याचे, पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेल्या पाच दुचाकी आणि एक रिक्षा असा एक लाख 60 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर, कर्मचारी विभीषण कान्हेरकर, हेमंत हांगे, विक्रांत गायकवाड, अशोक दुधवने यांच्या पथकाने ही कारवाई केली.