…तो धडक कारवाईचा इशारा मुख्याधिका-यांवरही ‘बूमरँग’?

मुख्याधिकारी राहत असलेल्या ग्रीन इस्टेटचे नळजोड तोडले


मालमत्ता कर व पाणीपट्टी न भरल्याचा परिणाम; चाकण नगरपरिषदेची कारवाई

एमपीसी न्यूज – घरपट्टी व पाणीपट्टी न भरल्यास सर्वात आधी पाण्याचे कनेक्‍शन तोडण्याचा इशारा चाकण नगरपरिषद प्रशासनाने शहरातील सुमारे चौदा हजार मिळकत धारकांना दिला आहे. मात्र, नगरपरिषदेचा पहिला दणका चक्क मुख्याधिकारी राहत असलेल्या चाकणच्या प्रभाग क्रमांक 3 मधील ग्रीन इस्टेट सोसायटीला बसला आहे. या सोसायटीचे नळजोड सोमवारी (दि. 6) तोडण्यात आले असल्याने या सोसायटीमध्ये राहणाऱ्या शेकडो नागरिकांत एकच खळबळ उडाली आहे. मुख्याधिकाऱ्यांचा इशारा त्यांच्यावरही बूमरँग ठरल्याची शहरात चर्चा सुरू झाली आहे.    

मार्च अखेरमुळे मालमत्ता कर  व पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी नगरपरिषद प्रशासन प्रमुख मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी कर्मचाऱ्यांची पथके नियुक्त करून सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत. मालमत्ता कर वसुलीच्या कामात कुचराई करणाऱ्या नगरपरिषदेच्या कामगारांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी साबळे यांनी दिला आहे. या पथकांवर नियंत्रक अधिकारी म्हणून ते स्वतः काम पाहत आहेत. त्यामुळे नगरपरिषद कर्मचारी आणि अधिकारी प्रत्येक वॉर्डात फिरून वसुली व धडक कारवाई करत आहेत. सुटीच्या दिवशीही वसुली जोरात चालू आहे.

चाकण नगरपरिषद हद्दीत 14 हजार मिळकतधारक व सुमारे 7 हजार नळजोड आहेत. त्यांच्या व इतर करांपोटी नगरपरिषदेला एकूण 2 कोटी रुपयांपर्यंत कर मिळतो. चालू आर्थिक वर्षात काही मिळकत धारकांनी थकबाकी जमा केली असली तरी अद्याप फारशी करवसुली झाली नाही. उर्वरित कर वसुलीसाठी नगरपरिषद प्रशासनाने वसुलीची विशेष मोहीम राबवली आहे. त्यामुळे धडक कारवाया करण्यात येत असून याचा सगळ्यात पहिला तडाखा खुद्द मुख्याधिकारी अशोक साबळे यांनाच बसला असून ते राहत असलेल्या ग्रीन इस्टेट सोसायटीचे नळजोड सोमवारी (दि.6) तोडण्यात आले आहेत.

स्वतःच शहरात सर्वत्र कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याने आपल्या सोसायटीत होत असलेली कारवाई थांबवावी म्हणून अनेक विनंत्या सर्वच स्तरातून होऊनही मुख्याधिकारी साबळे यांनी मात्र, नरो वा कुंजरो वा भूमिका घेतली. याच सोसायटीमध्ये चाकण पोलीस ठाण्याचे काही अधिकारी व कर्मचारीही राहण्यास आहेत. मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः राहत असलेल्या सोसायटी बाबतही हस्तक्षेप न करण्याची भूमिका घेतल्याने सोसायटीमधील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.