राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत निखिल कानेटकर याला विजेतेपद

एमपीसी न्यूज – 41 व्या भारतीय मास्टर्स (प्रौढ) राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद 2016-17 स्पर्धेत पुण्याच्या व माजी ऑलंपियन खेळाडू निखील कानेटकर याने 35 वर्षावरील एकेरी गटाचे विजेतेपद मिळवून एक नवा इतिहास रचला.


ही स्पर्धा केरळ येथील कोचिन येथे झाली. निखील कानेटकर अशा स्पर्धेत पहिल्यांदाच आणि पात्रता फेरीव्दारे सहभागी झाला होता. पात्रता फेरीतून मुख्य फेरीमध्ये प्रवेश करत निखील याने विजेतेपदासाठी गवसणी घातली. 1989 मध्ये आपल्या कारकीर्दीला सुरूवात करणार्‍या निखीलचे इंडियन मास्टर्स यामधील हे पहिले राष्ट्रीय विजेतेपद ठरले आहे. या विजेतेपदासह निखीलला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या 35 वर्षावरील गटामध्ये खेळण्याची संधीही या विजेतेपदामुळे मिळाली आहे. त्याने स्पर्धेच्या अंतिम 4 खेळाडूंमध्ये आपले नाव नोंदविल्यानंतरच जागतिक स्पर्धेच्या प्रवेशाचेव्दार त्याच्यासाठी खुले झाले होते.


अंतिम फेरीमध्ये निखील याने लखविंदर सिंग याचा 21-13, 21-6 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. हा सामना केवळ 37 मिनिटे चालला. या स्पर्धेच्या विजयी घौडदौडमध्ये निखीलने मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला. निखीलने पहिल्यांदा तिसर्‍या मानांकित राजीव शर्माचा पराभव केला. त्यानंतर सहाव्या मानांकित कौशिक तसेच आठव्या मानांकित शाम गुप्ता यांचा सनसनाटी पराभव केला.


या स्पर्धेत निखीलने14 गेम जिंकले तर, 2 गेममध्ये त्याचा पराभव झाला. त्याचे विजयी टक्केवारी 86.5 इतकी होती.

कोणत्याही राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवणेही खूप मोठी गोष्ट आहे, असे निखीलने मनोगत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.