​महिला दिनादिवशीही महिलांना स्वत:च्याच पैशांसाठी झगडावे लागतेय!

एमपीसी न्यूज – देशात आणि राज्यात आज (बुधवारी) जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, दुसरीकडे महिलांना स्वत:च्याच पैशांसाठी झगडावे लागत आहे. ही व्यथा आहे पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या ग्रामीण भागातील स्त्रियांची. घरातील किंवा कष्टातून कमावलेल्यातून पै-पै गोळा करून महिलांनी संस्कार ग्रुपमध्ये पैसे गुंतवले होते. मात्र, त्या पैशाचा आकर्षक परतावा तर सोडा अहो ती देखील हक्काची रक्कम मिळविण्यासाठी त्यांना आंदोलन करावे लागत आहे.

आकर्षक परताव्याच्या आमिषाने संस्कार उद्योग समुहाने पुणे जिल्ह्यात आपले जाळे पसरविले होते. विषेश  म्हणजे उद्योगांच्या जाहिरातीकरिता एका सीनेअभिनेत्रीलाच यांनी ब्रॅन्ड अम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केली होती. या अमिषाला बळी पडून, अगदी घरगुती काम करणा-या सर्वसामान्य महिलेपासून सुशिक्षितांनी यामध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. संस्कार बझार, संस्कार गुरुकुल, संस्कार वीमा योजना, पेन्शन योजना अशा अनेक योजना जाहीर केल्या होत्या. या सर्व योजनांमधील गुंतवणूक जमीन खरेदी-विक्री व्यवहारात केली जात होती.

महिलांनी पै-पै कमवून संस्कारमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र, केवळ नावातच संस्कार असलेल्यांनी गोरगरिब महिलांची मात्र फसवणूक केली आहे. आमच्या हक्काचे पैसे परत करा यासाठी महिलांनी संस्कारच्या मुख्य कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार देऊनही कोणतीच मदत मिळत नसल्याची खंतही यावेळी महिलांनी व्यक्त केली आहे.

महापालिका, राज्य सरकार महिलांना बचत गटात पैसे गुंतविण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. महिला पै-पै कमवून बचत गटात पैसे गुंतवितात. महिलांसाठी विविध योजना दिल्या जातात. मात्र, संस्कारमध्ये पैसे गुंतवून महिलांच्या डोक्याला ताप झाला आहे. स्वत:च्या पैशासाठीच महिलांना आंदोलन करावे लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.