पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये नगरसेवकांच्या गट नोंदणी प्रक्रियेला सुरुवात

आज अखेर 62 नगरसेवकांची नोंदणी पूर्ण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांच्या गट नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आज अखेर 62 नगरसेवकांची नोंद झाल्याची माहिती, निवडणूक अधिकारी प्रवीण अष्टीकर यांनी दिली.

राज्य सरकारच्या कायद्यानुसार प्रत्येक नगरसेवकाने नोंदणी करणे बंधनकारक असते. विभागीय आयुक्तांनी महापालिकेला गट नोंदणी करून घेण्याचे अधिकार दिले आहेत. सर्व पक्षांनी पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांची नावे महापालिकेच्या निवडणूक अधिका-यांकडे दिली आहेत. त्यानुसार नगरसेवकांनी नावनोंदणीला सुरुवात केली आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत 128 नगरसेवक आहेत. आज अखेर 128 नगरसेवकांपैकी 62 नगरसेवकांची  नोंदणी पूर्ण झाली, असल्याचे अष्टीकर यांनी सांगितले.

नवीन नरसेवकांची धांदल!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 128 नगरसेवकांपैकी 92 नगरसेवक नवीन असून नोंदणी किंवा महापालिकेचे कामकाज याबाबत माहिती घेण्यासाठी एकच धांदल उडाली आहे. अगदी कोणता विभाग कोणाकडे, विभागाचा प्रमुख कोण, नोंदणीसाठी काय काय करावे लागते, महापालिकेचे कामकाज कसे चालते याबाबत उत्सुकता आहे. तेवढेच त्यांच्यात अज्ञानही आहे. त्यामुळे माहिती घेता घेता त्यांची एकच धांदल उडत आहे.

यासाठी प्रशासनाला मात्र चांगलीच मेहनत घ्यावी लागत असून प्रत्येकाला कायदेशीर बाबी समजावून सांगणे तशी कागदपत्रांची पुर्तता करणे आदीसाठी त्यांना मेहनत घ्यावी लागत आहे. यासंदर्भात नवीन नगरसवेकांसाठी महापालिका कामकाजाबाबतचे प्रशिक्षण देण्याचेही प्रशासन विचार करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.