कोल्हापूरमध्ये ख्रिस्ती बांधवांवर झालेल्या हल्याचा पिंपरीत राष्ट्रवादीतर्फे निषेध

एमपीसी न्यूज – कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कारवे या गावी प्रार्थना करत असलेल्या ख्रिस्ती बांधवांवर झालेल्या भ्याड हल्याचा पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस ख्रिश्चन सेलच्या वतीने आज (शुक्रवारी) जाहीर निषेध करण्यात आला. 


पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आज (शुक्रवारी) सकाळी अकरा वाजता झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, ख्रिश्चन सेलचे शहराध्यक्ष दिपक सी अंकुश, ख्रिश्चन सेल पिंपरी मतदार संघाचे अध्यक्ष शौल कांबळे, चिंचवड मतदार संघाच्या स्नेहल डोंगरदिवे, भोसरीचे जेम्स साळवे तसेच येशुदास कालेकर, रेवरंड साळवी, डॅनियल अॅन्थनी यांच्यासह ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 
 

कोल्हापूर जिल्ह्यातील कारवे येथे मायकल शाहु फर्नांडीस यांच्या घरी रविवारी (दि.5) ख्रिस्ती बांधव प्रार्थना करत होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी  त्यांच्या घरावर दगडफेक करत भ्याड हल्ला केला. त्यामध्ये त्यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या हल्ल्याचा विविध ठिकाणाहून निषेध केला जात आहे.   
 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, ख्रिस्ती बांधवांवरील हल्ला निंदनीय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ख्रिस्ती बांधवांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. राष्ट्रवादी पक्ष नेहमीच सर्व जातीधर्मासोबत राहिला आहे. हल्लोखोरांना जशाच तसे उत्तर दिले पाहिजे. सरकारने अद्यापर्यंत याप्रकरणी कोणावरही कारवाई केली नाही. गृहमंत्री असेल्या मुख्यमंत्र्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. सरकारने हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी बोलताना केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.