दंगल घडवून आणणारा भाजपचा नगरसेवक शैलेश मोरे पोलिसांना शरण

अटक आणि जामीनावर सुटका

एमपीसी न्यूज – निवडणुकीपुर्वी प्रतिस्पर्धी उमेदवारावर दहशत निर्माण करण्यासाठी दंगल घडवून आणणारा भाजपचा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक शैलेश मोरे गुरुवारी (दि.9) पोलिसांना शरण आला. मोरवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामीनावर सुटका केली.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानाला काही तासांचा अवधी बाकी असताना मतदारांना पैसे वाटण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंचवड येथे 18 फेब्रुवारी रोजी रात्री राडा झाला होता. याप्रकरणी भाजपच्या उमेदवाराविरोधात दंगल माजविल्याप्रकरणी तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

विजयनगर, आनंदनगर, एम्पायर इस्टेट, भाटनगर प्रभाग क्रमांक 19 भाजपचे उमेदवार शैलेश प्रकाश मोरे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार काळूराम मारुती पवार हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत होते. 18 फेब्रुवारी रोजी रात्री पैसे वाटण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यातून त्यांच्यात भांडणे झाली.

याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली होती. राष्ट्रवादीचे काळूराम पवार यांच्याविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि भाजपचे उमेदवार शैलेश मोरे यांच्याविरोधात दंगल माजविल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा घडल्यापासून दोघेही पसार होते. पोलीस त्यांच्या मागावर होते. गेल्या 20 दिवसांपासून शैलेश मोरे पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर गुरुवारी (दि.9) शैलेश मोरे याने शरणागती पत्करली. गुरुवारी सकाळी मोरे आपल्या साथीदारांसह चिंचवड पोलिसांना शरण आला. पोलिसांनी मोरे यांच्यासह त्यांच्या पाच साथीदारांना अटक केली. मोरवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली. 

दरम्यान, राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक काळूराम पवार हा पसार आहे. त्याने अटक पूर्व जामीनासाठी शिवाजीनगर न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.