हुतात्मा लान्सनायक शहीद सौरभ फराटे यांना प्रभात पुरस्कार

शिवजयंतीनिमित्त प्रभात पुरस्कार 2017 व मिरवणुकीचे आयोजन 

एमपीसी न्यूज – शिवजयंतीनिमित्त प्रभात मित्र मंडळातर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी प्रभात पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे. बुधवार, दिनांक 15 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता गुरुवार पेठेतील कृष्णहट्टी चौक येथे होणाऱ्या कार्यक्रमात हुतात्मा लान्सनायक शहीद सौरभ फराटे यांच्या वतीने त्यांचे वडील नंदकुमार फराटे आणि आई मंगल फराटे हे पुरस्कार स्वीकारतील. यावेळी साध्वी सरस्वतीदेवी, मध्यप्रदेश, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी मंडळाचे उत्सव प्रमुख कुणाल जगताप, गोविंद मोरे, मंगेश शिंदे, अमोल थोरात आदी उपस्थित होते. मानचिन्ह, रोख रक्कम अकरा हजार रुपये, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा उत्सवाचे 31 वे वर्ष आहे. यापूर्वी अपंग सैनिक के.पी. सुनील, अंधांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते राहुल देशमुख, सैनिकांसाठी कार्य करणारे अशोक मेहंदळे अशा विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या मान्यवरांना प्रभात पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

किशोर चव्हाण म्हणाले की, तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रभावना निर्माण व्हावी, या मूळहेतूने स्थापन केलेल्या गुरूवार पेठेतील प्रभात मित्र मंडळातर्फे भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा मिरवणुकीमध्ये शहीद सौरभ फराटे यांना मानवंदना देण्यासाठी रथ असणार आहे. तसेच महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर दादा पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेला चाकणचा संग्राम दुर्ग हा जीवंत देखावा मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण आहे. याशिवाय शिवप्रतिमा असलेला आकर्षक रथ, शिववर्धन ढोल-ताशा पथक, अकलूजचे ओम श्री हलगी ग्रुप हे पारंपरिक हलगी पथक मिरवणुकीत सहभागी होणार आहे.

कसबा पेठेतील त्र्यंबकेश्वर प्रतिष्ठान मर्दानी आखाडातर्फे लाठी-काठी, दांडपट्टा, तलवार हे मर्दानी खेळ सादर करण्यात येणार आहेत. मिरवणूक कृष्णहट्टी चौक-गंजपेठ पोलीस चौकी-कस्तुरे चौक-फुलवाला चौक-जैन मंदिर-पंचमुखी मारुती मंदिर-पानघंटी चौक-शितळा देवी चौक मार्गे गुरूवार पेठेतील राम मंदिराजवळ समारोप होईल. मिरवणुकीत महिला देखील मोठ्या प्रमाणात पारंपारिक वेशात सहभागी होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.