शिक्षिका म्हणून काम करताना समस्या जवळून पाहिल्या; आता संधीचे सोने करणार – अनुराधा गोरखे

एमपीसी न्यूज – एक समाजसेविका म्हणून काम करताना माझ्या प्रभागात झोपडपट्टी असलेल्या भागातील समस्या जवळून पाहिल्या आहेत. आता जनतेने मला या समस्या सोडविण्यासाठी संधी दिली आहे व मी त्या संधीचे सोने करणार आहे, अशी  प्रतिक्रिया नवनिर्वाचित नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना व्यक्त केली.

 

गोरखे यांचे माहेर पुण्याचे. त्यामुळे शालेय शिक्षण पुण्यातच झालेले. त्याकाळी अकरावी एस.एस.सी. असल्याने तिथपर्यंत शिक्षण घेतलेले. त्यानंतर शासकीय टीचर्स ट्रेनिंग कोर्स पूर्ण केला. शालेय जीवनात देखील नाटके, खेळात आघाडी होत्या. विवाहानंतर पती सुरुवातीला भारत फोर्जमध्ये नोकरीला होते. नंतर चिंचवडला रस्टन ग्रीव्हजमध्ये नोकरीसाठी आले. त्यामुळे नंतरच्या काळात काळभोरनगरला स्थायिक झाले. सासर मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोद्यांचे. अनुराधा गोरखे काळभोरनगरमध्ये राहायला आल्या त्याचवेळी चिंचवड मल्याळी समाजम् स्कूल(सीएमएस) ची तिथे स्थापना झाली होती. तेथे 1983 पासून शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

 

याविषयी बोलताना गोरखे म्हणाल्या की, शाळेत दरमहा पालक मिटिंगची सवय लावली. त्यामुळे मुलांच्या समस्या कळल्या. फक्त शाळेच्या माध्यमातूनच नव्हे तर जेथे राहात होत्या त्या काळभोरनगर परिसरात देखील महिलांचे हक्काचे, मनातले बोलण्याचे ठिकाण आहेत.  परिसरातील दारुमुक्ती, घरातील भांडणे सोडवणे अशी कामे सुरू केली, असेही  गोरखे यांनी सांगितले.

 

याच दरम्यान महापालिकेच्या शाळा वॉर्ड समितीवर नियुक्ती  झाली. तसेच अनुराधा गोरखे यांनी एनआयबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, निगडी, नॉव्हेल कॉलेज ऑफ मॅनेजमेंट(एमबीए), संभाजीनगर, नॉव्हेल अध्यापक विद्यालय, मोहननगर, नॉव्हेल कॉलेज ऑफ बीबीए अॅण्ड बीसीए, मोहननगर, कलारंग कला संस्था या सर्व संस्थांच्या संस्थापक सदस्य आहेत. तसेच जिजामाता नागरी पतसंस्थेच्या खजिनदार, राष्ट्रतेज तरुण मंडळाच्या सदस्य आहेत. मनपा शाळा वॉर्ड समिती सदस्य, महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग, पुणे ग्रामीणच्या माजी सदस्या, शासनाच्या अन्नधान्य पुरवठा व वितरण विभागाच्या त्या माजी सदस्या आहेत.

 

गोरखे म्हणतात की, या सा-या पदामुळे मला जनतेशी जवळून संपर्क साधता आला. झोपडपट्टीच्या मुलांना शाळेसाठी सुविधा देणे, आजही झोपडपट्टीतील गल्लींमध्ये महापालिकेची गाडी येत नाही, ड्रेनेज, रस्ते अशी अनेक छोटी-छोटी मात्र, आवश्यक कामे मी हाती घेणार आहे. जनतेने दिलेल्या संधीचे मी सोने करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.