खेड पंचायत समिती सभापती – उपसभापतींची आज निवड

(अविनाश दुधवडे)

एमपीसी न्यूज – खेड पंचायत समिती सभापती पदाची निवड प्रक्रिया आज (मंगळावारी) राजगुरूनगर येथे पार पडणार असून या निवडीत काँग्रेस आणि भाजपची निर्णायक भूमिका असणार आहे. त्यामुळे खेड पंचायत समितीचा सभापती पदी कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

खेड पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे. खेड पंचायत समितीची सदस्य संख्या चौदा असून यामध्ये शिवसेनेला सात जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीला काँग्रेसला चार, भाजपला दोन आणि काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. बहुमतासाठी शिवसेनेला एका सदस्याची आवश्यकता असून खेड पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकेल असा ठाम विश्वास आमदार सुरेश गोरे यांच्या गोटातून व्यक्त होत आहे.

खेड पंचायत समितीचे सभापतीपद अनु.जमाती महिलेसाठी आरक्षित असल्याने शिवसेनेकडून रेटवडी पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या सुभद्रा शिंदे या सभापती पदाच्या दावेदार आहेत. सभापतीपदासाठी आरक्षित असलेल्या प्रवर्गातील आणखी एक उमेदवार भाजपकडे आहे. मात्र भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही. खेड तालुक्यात काँग्रेस पक्षाला पुन्हा बळकटी आणण्यासाठी पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेस सहकार्य करण्याची भूमिका असल्याचे खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस यांनी स्पष्ट केले आहे. तसे झाल्यास पंचायत समितीचे उपसभापती पद महाळुंगे पंचायत समिती गणातून विजयी झालेले काँग्रेसचे अमोल पवार यांना मिळण्याची शक्यता आहे.

सत्ता स्थापनेस कोणतीच जुळवाजुळव झाली नाही तर शेवटी पक्षीय बलाबलानुसार मतदान प्रक्रिया पार पडून सर्वाधिक मते मिळविणारा उमेदवार विजयी होऊ शकतो. अनेक वर्षानंतर खेड पंचायत समितीमध्ये शिवसेनेच्या संख्याबळानुसार सत्ता परिवर्तन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीच्या इतिहासानुसार दोन गटांची समसमान मते होऊन नशिबाच्या हवाल्यावर सभापती व उपसभापतींची निवड यंदा होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. आमदार सुरेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली सेनेची सत्ता खेड पंचायत समितीमध्ये स्थापन होण्याची सर्वाधिक शक्यता असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरु आहे.

जनतेचा कौल आम्हाला मान्य – दिलीप मोहिते (मा.आमदार,खेड)

जनतेने यंदाच्या निवडणुकीत आम्हाला कौल दिलेला नाही. त्यामुळे सभापती उपसभापती निवडणुकीसाठी कुठलेही अर्ज राष्ट्रवादीकडून भरले जाणार नाहीत. राष्ट्रवादीचे चारही सदस्य या निवडींपासून अलिप्त राहतील. कदाचित आमचे सदस्य या निवडीच्या दरम्यान अनुपस्थित राहू शकतात, असे राष्ट्रवादीचे खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले.

सभापतीपदासाठी अर्ज दाखल करणार – शरद बुट्टे-पाटील (जि.प.सदस्य)

पिंपरी गणातून अनु.जाती प्रवर्गातून भाजपच्या धोंडाबाई खंडागळे निवडणून आल्या आहेत. आम्ही सभापतीपदासाठी अर्ज दाखल करणार आहोत. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे या बाबत सर्वानुमते निर्णय घेण्याची वेळ आल्यास आम्ही सभापती पदाचा अर्ज मागेही घेऊ शकतो असे भाजपचे जि.प.सदस्य शरद बुट्टे- पाटील यांनी सांगितले.

सर्वांना सोबत घेणार – सुरेश गोरे (आमदार खेड)

जनतेने शिवसेनेच्या विकासाच्या विचारांना साथ दिली आहे. यासाठीचे पुरेसे संख्याबळ आमच्याकडे असल्याचे सूचक विधान खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी केले आहे. सर्वांना सोबत घेऊन सभापती व उपसभपती यांच्या निवडी होतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.