शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

पुण्याच्या उपमहापौरपदी रिपाइचे नवनाथ कांबळे

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या उपमहापौरपदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे नवनाथ कांबळे यांची आज (बुधवारी) निवड करण्यात आली. त्यांनी लता राजगुरू यांचा 46 मतांनी पराक्षव केला.  

नवनाथ कांबळे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जुने कार्यकर्ते आहेत. 1997 मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. उपमहापौर पदासाठी आरपीआय-भाजप युतीकडून नवनाथ कांबळे, शिवसेनेकडून विशाल धनवडे आणि आघाडीमार्फत लता राजगुरू यांनी अर्ज भरले होते. मात्र शिवसेनेकडून विशाल धनवडे यांनी माघार घेतल्यामुळे कांबळे आणि राजगुरू यांच्यात हात वर करुन निवडणूक घेण्यात आली.  या निवडणुकीतून नवनाथ कांबळे यांना 98 मते मिळाली असून त्यांचा 46 मतांनी विजय झाला आहे. लता राजगुरू यांना 52 मते मिळाली होती.

2002 साली झालेल्या त्रिदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये प्रभाग क्रमांक 14 मधून ते विजयी झाले होते. त्यांनी काही काळ रिपाइंचे शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषविले.

भाजपने पुणे महापालिका निवडणुकीसाठी रिपाइंसोबत युती केली होती. त्यानंतर स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर रिपाइंच्या उमेदवाराला उपमहापौर पद देण्याचा निर्णय झाल्यानंतर या पदासाठी अ‍ॅड. नवनाथ कांबळे यांच्या नावावर रिपाइंच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

पुणे शहरातील 162 जागांपैकी 10 जागांवर रिपाइंच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यापैकी पाच जागांवर रिपाइंचे उमेदवार निवडून आले. रिपाइंबरोबर झालेल्या युतीची फायदा भाजपच्या उमेदवारांनाही झाला आहे.

spot_img
Latest news
Related news