शनिवार, डिसेंबर 3, 2022

खराबवाडीचे चार ग्रामपंचायत सदस्य बडतर्फ

माजी सरपंच व उपसरपंच यांचाही समावेश

विभागीय आयुक्तांचा आदेश

(अविनाश दुधवडे)

एमपीसी न्यूज – कायद्याचे उल्लंघन करीत चुकीचा ठराव केल्याप्रकरणी खराबवाडीचे (ता.खेड) माजी सरपंच, उपसरपंच व दोन सदस्यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पुण्याचे विभागीय आयुक्‍त एस.चोक्कलिंगम यांनी दोषी ठरविले आहे. या चारही जणांना ग्रामपंचायतीतून बडतर्फ करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्याच प्रमाणे तत्कालीन ग्रामसेवकावर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. विभागीय आयुक्तांचा हा आदेश येथील पंचायत समितीस प्राप्त झाल्यानंतर यावरील कार्यवाही केली जाणार आहे.

खराबवाडीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य हनुमंत अनंता कड, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य रवींद्र राजाराम धाडगे, विद्यमान सदस्य सागर पांडुरंग खराबी व रोहिदास बबन शिळवणे या चौघांनी आपल्या कर्तव्यात कसूर, तसेच अधिनियमातील तरतुदींचा भंग केल्याने पदावरून काढण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी दिला आहे. खराबवाडी (ता.खेड) येथील रस्त्याच्या प्रकरणावरून ग्रामपंचायतीचे सदस्य जीवन खराबी व त्यांच्या गटातील अन्य काही सदस्यांनी रस्त्यांच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याच्या गंभीर तक्रारी केल्या होत्या. तेव्हापासून खराबवाडीचे तत्कालीन सरपंच व उपसरपंच अडचणीत आले होते. या बाबतच्या गंभीर तक्रारीनंतर आयुक्तांनी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्याधिका-यांना चौकशीचे आदेश दिले होते.

11 जानेवारी 2017 रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अहवाल तयार केला. अहवालामध्ये खराबवाडीचे तत्कालीन सरपंच हनुमंत कड व तत्कालीन उपसरपंच रवींद्र राजाराम धाडगे व चुकीच्या ठरावाला सूचक आणि अनुमोदक असलेले दोन सदस्य हे दोषी असल्याचा अहवाल दिला होता. त्या अहवालाबाबत आयुक्तांनी सुनावणी घेवून हा बडतर्फीचा निर्णय दिला आहे. यातील तक्रारदारांनी आयुक्तांकडे खराबवाडीतील अंतर्गत रस्त्याच्या कामामध्ये मूल्यांकन न करता व ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये ठराव न करता काम सुरु होण्यापूर्वी धनादेश अदा केल्यासारख्या अनेक गंभीर तक्रारी केल्या होत्या. संबंधित तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी हा निर्णय दिला असून खराबवाडी मध्ये या निर्णयाने खळबळ उडाली आहे.

हि विकासकामांसाठी शिक्षा? – हनुमंत कड

याबाबत माजी सरपंच हनुमंत कड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ज्या रस्त्याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या त्या रस्त्याचे काम व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती. सर्व नियमांचे पालन करून 21 लक्ष रुपयांच्या रस्त्याचे काम पूर्ण केले. मात्र त्यासाठी केवळ 9 लाख 90 हजार रुपये अदा करण्यात आले असून उर्वरित रक्कम देणे आहे. मात्र सत्तेच्या हव्यासातून काही मंडळींनी जाणीवपूर्वक खोट्या तक्रारी आणि खोटे पुरावे देण्याचे नियोजनबद्ध काम केले आहे. गावकीच्या राजकारणातून विकासकामांसाठी हि शिक्षा मिळाली असून या बाबत अपील करणार आहे. त्याठिकाणी आम्हाला न्याय मिळेल, असा ठाम विश्वास माजी सरपंच कड आणि माजी उपसरपंच रवींद्र धाडगे यांनी व्यक्त केला आहे.

सत्तेची सूत्रे बदलणार ?

खराबवाडी ग्रामपंचायत ही 17 सदस्यीय आहे. यातील माजी सरपंच, माजी उपसरपंच, तसेच अन्य दोन सदस्यांना म्हणजेच 17 पैकी 4 सदस्य पुणे विभागीय आयुक्‍तांनी बडतर्फ केल्याने ग्रामपंचायतीच्या सत्तेची सूत्रे बदलणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Latest news
Related news