तरुणाईच भविष्यात शांत व शक्तीशाली भारत घडवेल – लेफ्टनंट जनरल पाटील


शौर्या तुला वंदितो कार्यक्रमातून कारगील विजय दिवस चिंचवड येथे साजरा

एमपीसी न्यूज – भारत हा विकसनशील देश असून देशात झापाट्याने परिवर्तन होत आहे. या परिवर्तनातूनच तरुण भविष्यातला शांत व शक्तीशाली भारत घडवतील, असा विश्वास लेफ्टनंट जनरल व्हि.एम. पाटील यांनी आज (बुधवारी) चिंचवड येथे व्यक्त केला.

सह्याद्री प्रतिष्ठान व पुणे फार्मासिस्ट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात कारगील युद्धाच्या विजयाला 18 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त शौर्या तुला वंदितो हा क्रार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाटील बोलत होते. या कार्यक्रमासाठी महापौर नितीन काळजे, सत्तारुढपक्षनेते एकनाथ पवार, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, गजानन चिंचवडे, सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर, पुणे फार्मासिस्ट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष राहुल वाडगाये, ब्रिगेडिअर मधुकर प्रचंड, लेफ्टनंट कर्नल जयवंतराव चितळे, प्रताप भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, भारताचे परिवर्तन कोणी रोखू शकणार नाही. भारत 21 व्या शतकात आशिया खंडातील सर्वात प्रभावशाली देश बनलेला असेल. या परिवर्तनात तरुणाईने सहभाग नोंदवला पाहिजे. त्यांनी नम्रता, आत्मविश्वास, सभ्यता, शिस्त, सत्य व शिक्षण याच्या जोरावर भविष्यातला शांत व शक्तीशाली भारत घडवावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी लालन पाटील, सोमनाथ मच्छिंद्र शेळके, सी.एफ.एन. रवींद्र धुमाळ, नायक अशोक कोरटकर, नायक सुभेदार बाबासाहेब तरडे, नायक सुभेदार प्रल्हाद जगताप, हवालदार विलास पाटील, कॅप्टन अशोकराव काशीद, कॅप्टन वामनराव वाडेकर, कॅप्टन जयराम चिकने यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नी व वीर माता यांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी आपले मनोगत सादर करताना शहीद जवान सौरभ फराटे यांच्या वीर पत्नी सुवर्णा फराटे म्हणाल्या की, जवान सीमेवर शहिद होते. तेव्हा केवळ त्याचे बलिदान दिले जात नाही तर त्या बरोबर त्याच्या पत्नीला दिलेल्या 7 जन्माच्या वचनाचे, मुलांना दाखवलेल्या स्वप्नांचे व आई-वडिलांच्या एकमेव आधाराचे बलीदान सीमेवर गेलेले असते. त्यामुळे जवानांच्या पश्चात त्यांच्या पत्नीचे व कुटुंबाचे पुढे काय होते याचा विचार सरकार व सामान्य जनतेनेही करावा, अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमातून आज आपण एकटे नाही याची पुन्हा जाणीव झाली, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदाची सूत्रेही यावेळी सचिन शेडगे यांच्याकडे देण्यात आली व त्यांना सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले. तसेच कार्यक्रमामध्ये शहरपरिसरातील एकूण 13 शाळा व त्यांचे विद्यार्थी आवर्जून सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रताप भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.