खेड तालुक्यातील पेट्रोल पंप गुन्हे शाखेच्या रडारवर; तालुक्यातील काही पंपांवर छापे

दोन दिवसात तीन पंपांची तपासणी

(अविनाश दुधवडे) 

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपावरील मशिनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स चीप बसून इंधन चोरीचा प्रकार उघड झाल्यानंतर सर्वत्र पंपावर छापे घातले जात असून यात खेड तालुक्यातील काही पंपावर गुन्हे अन्वेषण पथकाने छापे मारले आहेत. या ठिकाणी मशिन सदोष असल्याची माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे. मात्र, नेमकी कोणत्या पंपावर किती पेट्रोल चोरी केली जात होती, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. 

पुणे नाशिक महामार्गावरील वाकी ( ता. खेड) जवळील एका बड्या राजकीय नेत्याच्या पंपासह खेड तालुक्यातील तीन पंपावर दोन दिवसापूर्वी छापे मारण्यात आले असून, मागील महिनाभरापासून असे मोजके जुने पंप गुन्हे अन्वेषण पथकाने कारवाईच्या कात्रीत घेतले आहेत.  

मुंबईमधील ठाणे आणि डोंबिवली शहरातील कारवाईनंतर राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धाडसत्र सुरू केले असून खेड तालुक्यातील काही पंपाचा समावेश आहे, अशी माहिती ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे होती. काही पंपांवर इंधन भरणाऱ्या यंत्रामध्ये मायक्रोचीप बसवून त्याद्वारे चोरी सुरू असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली होती. इलेक्ट्रॉनिक चिपच्या माध्यमातून पेट्रोल व डिझेल चोरी करणारे रॅकेट मुंबईत पकडण्यात आल्यानंतर या रॅकटेमधील काही जणांना गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यांच्याकडून राज्यातील काही जिल्ह्यात पेट्रोल पंपावर इलेक्ट्रॉनिक्स चीप बसविण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यांची यादी गुन्हे शाखेकडे असून या यादीत खेड तालुक्यातील काही पेट्रोल पंपाची नावे आहे, अशी माहिती प्राप्त होत आहे.

त्या यादीनुसार मागील महिनाभरापासून तालुक्यातील बड्या मंडळींच्या पेट्रोल पंपावर धाडी टाकल्याची चर्चा आहे. यानुसार मागील महिनाभरापासून गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने इंडियन ऑईलच्या व हिंदुस्थान पेट्रोलियमच्या काही मोठ्या पेट्रोल पंपावर छापा मारल्याची चर्चा आहे. छापे मारून तपासणी करताना गुन्हे शाखेने, वैधमापन विभाग, इंडियन ऑईल कंपनीचे अधिकारी, यांनी संयुक्तरित्या स्थानिक पोलिसांना सूचित करून या पेट्रोल पंपावर छापे मारले जात आहेत. 

संबंधित पेट्रोल पंपावरील सर्व मशिनची तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात येत आहे. त्यात काही मशीन सदोष आहेत का? याची तपासणी करण्यात येत असून या मशिनमधून प्रति लिटर मागे पेट्रोल कमी येत आहे काय ? या बाबतची तपासणी करण्यात येत आहे. या बाबतचे नेमके किती इंधन कमी दिले जात होते याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकी किती व कुठे पेट्रोल चोरी केली जात होती, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

मापात पाप करणारे रडारवर 

पेट्रोल चोरी करून ग्राहकांची लूटमार करणारे काही पंप पोलिसांच्या रडारावर आले असून या पंपांवर छापे मारण्यात येत आहेत. खेड तालुक्यातील काही पंपाची गेल्या दोन दिवसांपूर्वी तपासणी झाल्याची व काहींची केली जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मागील महिनाभरात पाच पंपांवर छापे मारण्यात आले असून प्रथम दर्शनी सदोष आढळलेल्या काहींना इंधन विक्री करण्यास अटकाव करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे पेट्रोलपंप चालकांत मोठी खळबळ उडाली आहे. मागील अनेक वर्षांपासून या व्यवसायात असणारे आणि मोठ्या प्रमाणावर ‘मापात पाप’ करीत असल्याच्या तक्रारी असणारे बडे पंपचालक या कारवाईच्या कात्रीत खरोखर येणार का ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.