Pune News : दुर्मिळ खवल्या मांजराची तस्करी करणारे 5 जण जेरबंद

एमपीसी न्यूज : दुर्मिळ असलेल्या खवल्या मांजराचे तस्करी करणाऱ्या पाच जणांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केले. वरंधा घाटात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यावेळी पाच जणांना अटक केली तर पाच जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. भोर व महाड वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, भोरच्या वरंधा घाटात खवल्या मांजराचे तस्करी होणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानंतर वनविभागाने नकली ग्राहक बनवून वरंधा घाटात सापळा रचला होता. परंतु खवल्या मांजराची तस्करी करणारी ही टोळी आलीच नाही. यातील सर्वजण महाडमधील टोळ बुद्रुक या गावातील असल्याचे समजले होते. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या गावात छापा टाकला आणि पाच जणांना ताब्यात घेतले. तर पाच जण पळून गेले आहे.

आरोपींच्या ताब्यातून एक जिवंत खवले मांजर ताब्यात घेण्यात आले आहे. तर तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. या आरोपीकडून वन्य पशु पक्षांची मोठ्या प्रमाणात तस्करी केली असल्याची शक्यताही वन विभागाने वर्तवली आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.