Cantonment News : कॅन्टोन्मेंट हद्दीतील वाहन प्रवेश शुल्क आकारणी थांबविण्याची सूचना 

एमपीसी न्यूज – देशातील सर्व कॅन्टोन्मेंट हद्दीत वाहन प्रवेश शुल्क आकारणी थांबविण्याची सूचना संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण मालमत्ता विभागाने कॅन्टोन्मेंट बोर्डांना केली आहे.त्यामुळे पुणे, खडकी आणि देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील वाहन प्रवेश शुल्क आकारणी बंद होणार आहे. प्रवेश शुल्क आकारणी बाबत वाहन चालक सातत्याने तक्रार करत होते. अखेर शुल्क आकारणी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

कॅन्टोन्मेंट कायदा 2006 नुसार कॅन्टोन्मेंट हद्दीत वाहन प्रवेश शुल्क आकारणी केली जात होती. जीएसटी लागू झाल्यानंतर कँटोन्मेंट बोडाँकडून ‘एलबीटी’ सह वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद करण्यात आली. लष्कर भागातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांकडून 20 ते 70 रुपयांचे प्रवेश शुल्क घेतले जात होते. मात्र, आता संरक्षण मालमत्ता विभागाने वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यामुळे व्यावसायिक वाहनांची या कराच्या कचाट्यातून सुटका झाली आहे.

दरम्यान, वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद केल्याने बोर्डाची आर्थिक कोंडी आणखी वाढणार आहे. तसेच वाहन प्रवेश शुल्कापोटी बोर्डाला मिळणारी रक्कम आता बोर्ड हद्दीतील नागरिकांकडून वसूल केली जाते की काय अशी शंका येथील नागरिक व्यक्त करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.