Pune News : कोरोनाचा फटका : नगरसेवकांच्या 60 टक्के निधीला कात्री लागणार

एमपीसी न्यूज – पुणे शहरात मागील 5 ते 6 महिन्यांपासून निर्माण झालेल्या कोरोनाचा फटका पुणे महापालिकेला बसला आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या (स – यादी) निधीला 60 टक्के कात्री लागणार आहे. उर्वरित 40 टक्के निधीतून काय कामे होतील, असा सवाल सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.

मोठे प्रोजेक्ट काहीही होणार नसल्याचे या नगरसेवकांनी सांगितले. पुणे महापालिकेचे उत्पन्न वाढले, तर विकासकामांचा निधीही वाढविण्यात येणार आहे. मोठे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने निधी देण्याचा निर्णय महापौर बंगला येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आणि शान्तनू गोयल या बैठकीला उपस्थित होते.

राज्य सरकारने स्व-निधी खर्च करण्यास परवानगी दिल्याने कुठली विकासकामे सुरू करायची, प्रस्तावित उत्पन्न किती असेल, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला आहे. भांडवली कामांसाठी 1500 कोटी रुपये मिळतील, त्यानुसार खर्च करण्यावर चर्चा करण्यात आली. समान पाणी पुरवठा योजना, कात्रज-कोंढवा रस्ता, भामा आसखेड योजना, आंबिल ओढा, मलनिःसारण प्रकल्पासाठीचे भूसंपादन, पीएमपीएल, घनकचरा प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना, वैद्यकीय महाविद्यालय, विविध उड्डाणपूल, भवन, पथ, तसेच माहिती तंत्रज्ञान विभागांसाठी येणारा खर्च यावर बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.