Pimpri: आणखी सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; दिवसभरात 11 पॉझिटीव्ह

आजपर्यंत 96 जणांना कोरोनाची लागण; 29 जण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरीगावातील चार, काळेवाडी फाटा येथील एक आणि रुपीनगर येथील आणखी दोन रुग्ण सात जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये दोन पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. तर, आज (सोमवारी) सकाळीच रुपीनगरमधील तीन आणि मोशीतील एक अशा चार जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. आज दिवसभरात 11 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. शहरातील कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांचा आकडा 68 वर पोहचला असून आजपर्यंत 96 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 29 जण कोरोनामुक्त झाले असून चौघांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने रविवारी (दि. 26) 116 जणांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट आज सायंकाळी आले आहेत. त्यामध्ये पिंपरीगावातील चार जण, रुपीनगरमधील दोन आणि काळेवाडी फाटा येथील एक अशा सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत. त्यामध्ये 33 आणि 77 वर्षीय दोन पुरुष आणि 12, 17, 18, 40, 40 वर्षीय पाच महिला रुग्णांचा समावेश आहे.

मागील वीस दिवसांत 71 नवीन रुग्णांची भर!

शहरात 8 एप्रिल पासून दररोज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण येत आहेत. 8 एप्रिलला एक, 9 ला तीन, 10 एप्रिल रोजी चार, 11 एप्रिलला दोन , 12 एप्रिलला पाच, 13 एप्रिल रोजी दोन, 14 एप्रिल रोजी एकाच दिवशी सहा, 15 एप्रिल रोजी चार, 16 एप्रिल रोजी चार, 17 एप्रिल रोजी दोन, 18 एप्रिल रोजी सात, 19, 20, 21 एप्रिल रोजी प्रत्येकी एकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. 22 एप्रिल रोजी तीन, 23 एप्रिल रोजी तीन रुग्ण, 24 एप्रिल रोजी एकाच दिवशी 11 रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यामध्ये आज 25 एप्रिल रोजी दोन, 26 एप्रिल रोजी एक आणि आज 27 एप्रिल रोजी सकाळी चार आणि सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने मागील वीस दिवसात तब्बल 71 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील आणि शहराबाहेरील पण शहरात उपचार सुरू आहेत अशा 96 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 29 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 68 रुग्ण शहरात आहेत. त्यातील 56 रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तर शहरातील नऊ रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महापालिका हद्दीबाहेरील तीन रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, रविवारी (दि.12) थेरगाव भागातील एका पुरुषाचा, सोमवारी (दि.20) निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि शुक्रवारी (दि. 24) निगडीतील एका पुरुष रुग्णाचा अशा चार जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.