Pune : दुरुस्ती कामामुळे पुणे – लोणावळा दरम्यान धावणाऱ्या काही लोकल रद्द

एमपीसी न्यूज- लोहमार्गाखालील खडी बदलण्याच्या कामासाठी तसेच लोहमार्ग दुरुस्ती देखभालीच्या कारणास्तव 1 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत पुणे लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत धावणाऱ्या चार लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून देण्यात आली आहे.

पुण्याहून दुपारी 12.15 आणि 1.00 वाजता लोणावळ्यासाठी सुटणाऱ्या आणि लोणावळ्याहून दुपारी 2.00 आणि 3.40 मिनिटांनी सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. या कालावधीत लोणावळ्याहून दुपारी 2.40 मिनिटांनी पुण्यासाठी सुटणारी लोकल आणि पुण्याहून सकाळी 11.15 वाजता सुटणारी कर्जत पॅसेंजर सुरू राहणार आहे.

रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे- लोणावळासह पुणे- दौंड आणि कोल्हापूर मार्गावर लोहमार्ग, सिग्नल यंत्रणा आदींच्या दुरुस्ती देखभालीची कामे एकाच वेळी करण्यात येत आहेत. थंडीच्या मोसमामध्ये रेल्वे रुळांना तडे जाण्याचे प्रकार होत असतात. खडी बदलण्याच्या या कामातून तडे जाण्याचे प्रकार कमी करणे शक्य होते. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. खडी बदलण्याचे हे काम दहा वर्षांतून एकदा करण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.