Wakad : वसाहतींच्या सुरक्षेत सुरक्षा रक्षकांची भूमिका महत्त्वाची – नम्रता पाटील (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – शहरात सर्वच क्षेत्रात होत असलेला विकास, औद्योगिकरण, शैक्षणिक संस्था, आयटी हब यामुळे शहरात रोजगार उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे इथे मोठमोठ्या वसाहतींची संख्या देखील वाढली आहे. या वसाहतींच्या सुरक्षेत सुरक्षा रक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. वसाहतीमधील सर्वच लोक सुरक्षा रक्षकांवर विश्वास ठेवून आपली कोट्यवधी रुपयांची संपत्ती ठेवून जातात. हा विश्वास प्रत्येक सुरक्षा रक्षकाने सार्थक ठरवला पाहिजे, असे मत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी व्यक्त केले.

वाकड पोलिसांतर्फे वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्व वसाहतींचे प्रतिनिधी, सुरक्षा रक्षक यांच्यासाठी मालमत्ता सुरक्षा, आगीचे प्रसंग, लिफ्ट मधील अपघात यांच्याबाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी उपायुक्त नम्रता पाटील बोलत होत्या. शिबिरासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, अग्निशमन विभागाचे ऋषिकांत चिपाडे, बालाजी सोसायटीचे बिजू बिलाई, प्रमुख वक्ते शरद श्रीवास्तव, रॉनी चौधरी, संतोष शर्मा, सर्व वसाहतींचे सदस्य आणि सुरक्षा रक्षक उपस्थित होते.

नम्रता पाटील म्हणाल्या, “मी सुद्धा एका सोसायटीमध्येच राहते. कामावर असताना सोसायटीचा सुरक्षा रक्षकच सोसायटीची सुरक्षा करतो. त्यामुळे मुळात तो विश्‍वासू व अधिकृत असायला हवा. कारण सुरक्षा रक्षकांचाही गुन्ह्यांमध्ये मोठा हात असतो. सोसायटीमध्ये येणारा डिलीव्हरी बॉय, विक्रेता यांची देखील नोंद ठेवायला हवी. खात्री पटल्या शिवाय आत सोडू नये. सोसायटीची सुरक्षा आणि त्यासाठीचे नियम सर्वांनी पाळायला हवे. सोसायटी परिसरात एखादी घटना घडल्यानंतर सर्वांनीच पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. ही घटना माझ्या इथे नाही शेजाऱ्याकडे घडली आहे, असे म्हणून जबाबदारी झटकणे चुकीचे आहे”

सुरक्षा विषयाचे तज्ञ शरद श्रीवास्तव म्हणाले की, सुरक्षा व्यवस्था पुरवणाऱ्या खासगी कंपनीसाठी वेगळे कायदे आहेत. त्या कायद्यांचे पालन संबंधित कंपनीने करणे फार गरजेचे आहे. त्यांच्याद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षा रक्षकाची संबंधित सोसायटीने सर्व कागदोपत्री माहिती घेणे गरजेचे आहे. त्याला सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्याचा कायदेशीर पुरावा त्याच्याकडे आहे का; हे पाहणे देखील महत्वाचे आहे. संबंधित सुरक्षा कंपनी किंवा सुरक्षा रक्षकावर या आधी कोणताही गुन्हा दाखल नसावा, तसेच सुरक्षारक्षक हा ओळखीचा असेल तर उत्तम. कादेशीर कागदपत्रांची त्याने पूर्तता केलेली असावी. तसेच सोसायटीमध्ये केवळ सीसीटीव्ही बसवून फायदा नाही तर त्यांची वेळोवेळी दुरुस्ती करण्यात यावी व त्यांचे व्हीडीओ रेकॉर्ड देखील जपून ठेवण्यात यावे. तरच त्यांचा फायदा होईल, असेही श्रीवास्तव यांनी सांगितले.

अग्निशमन विभागाचे ऋषिकांत चिपाडे म्हणाले की, हिंजवडी व वाकड भागातून सर्वाधिक फॉल्स कॉल येतात जे आमच्यासाठी त्रासदायक ठरतात. त्यामुळे नागरिक म्हणून सुरक्षा यंत्रणांना योग्य ती माहिती देणे ही सर्वांची जबाबदारी आहे. तसेच तुमच्या सोसायटीमध्ये किंवा कार्यालयातील आग विझवण्याची जी यंत्रणा आहे ती कायम अद्ययावत ठेवा, तसेच वीज यंत्रणेची वेळोवेळी दुरुस्ती करत रहा. आपत्कालीन काळात शक्‍यतो लिफ्टचा वापर करु नका. लिफ्ट यंत्रणाही सोसायटींनी वेळोवेळी दुरुस्त करणे गरजेचे आहे.

प्रास्ताविकात सतीश माने म्हणाले, “वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 350 पेक्षा अधिक वसाहती आहेत. पैकी 325 सोसायट्यांमध्ये सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सुरक्षा व्यवस्था असताना देखील गुन्हे घडत असल्याने या सुरक्षा यंत्रणांमध्ये सुधारणा आणण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.