Pune : कोकणी माणसाच्या हातून मुंबई निसटतेय ! उद्योजकतेची कास धरा ! खासदार आढळराव पाटील

7 व्या ' ग्लोबल कोकण फेस्टिव्हल' चा समारोप

एमपीसी न्यूज- ‘मुंबई घडविण्यात कोकणवासियांचा खूप मोठा वाटा असला तरी आज कोकणी माणसाची जागा बिहारी ,राजस्थानी माणसांनी घेतली आहे . मराठी माणूस छोटी कामे करण्यास कमीपणा वाटून घेत असल्यास तो कमीपणा न मानल्यास भविष्यात त्यातूनच मोठा उद्योजक घडू शकतो’ असे मत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.

७ व्या ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ‘ चा समारोप खासदार शिवाजीराव आढळराव -पाटील यांच्या उपस्थितीत झाला, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्लोबल कोकण फेस्टिव्हलचे संयोजक आणि ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’ चे प्रमुख संजय यादवराव होते. यावेळी माजी महापौर राजलक्ष्मी भोसले,’वनराई ‘चे अध्यक्ष रवींद्र धारिया, अरविंदनाथ महाराज,’हिरवळ प्रतिष्ठान’चे अध्यक्ष किशोर धारिया, फेस्टिव्हलचे सहसंयोजक ‘एक्झिकोन ग्रुप’चे प्रमुख एम. क्यू . सय्यद, उद्योजक रामदास माने, राजश्री यादवराव इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

खासदार आढळराव म्हणाले,”कोकणातील सर्व उद्योजकांना एकत्र करून आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल भरवून मोठे ग्लोबल मार्केट संयोजकांनी उपलब्ध करून दिले आहे. हा उल्लेखनीय प्रयत्न आहे. प्रथमपासून भारताची औद्योगिक राजधानी मुंबईवर कोकणी माणसाचे प्राबल्य होते. आता मात्र ही पकड निसटत असून बिहारी, राजस्थानी माणसाची संख्या वाढत आहे. मराठी माणूस छोटी कामे करण्यास कमीपणा न मानल्यास भविष्यात त्यातूनच मोठा उद्योजक घडू शकतो. त्यामुळे आता उद्योजकतेची कास धरली पाहिजे”

कोकणाचा विकास होताना शहरात आलेले कोकणवासीय पुन्हा कोकणात जाऊन आपला आणि प्रदेशाचा उत्कर्ष साधतील तो खरा सुदिन म्हणावा लागेल, असे रवींद्र धारिया यांनी यावेळी म्हणाले.

‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ‘ च्या निमित्ताने पुण्यात कोकणविषयक काम करणाऱ्या 300 संस्था एकत्र आल्या, हे मोठे यश आहे. येत्या मार्चमध्ये 1 हजार कोकणी उद्योजकांची परिषद पुण्यात आयोजित केली जाणार आहे’ अशी माहिती संजय यादवराव यांनी यावेळी बोलताना दिली .

फेस्टिव्हलमध्ये सहभागी उद्योजक ,कलाकार ,हितचिंतकांच्या सत्कार खासदार आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला . एम . क्यू . सय्यद यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.