Chinchwad: प्रा. मोरे प्रेक्षागृहात नाट्य, लोककला, गायनातील तैलचित्रे बसविणार

एमपीसी न्यूज – सुप्रसिद्ध चित्रकार सुनील शेगांवकर यांनी रेखाटलेली नाट्य, लोककला, गायन क्षेत्रातील तैलचित्रे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या अंतर्गत भिंतीवर लावण्यात येणार आहेत. त्यामुळे नव्यानेच रसिकांच्या सेवेत आलेल्या या प्रेक्षागृहाची शोभा अधिकच वाढणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आहे. या प्रेक्षागृहाच्या नुतनीकरणाचे काम नुकतेच संपले आहे. प्रेक्षागृह नुतनीकरण कामासाठी नेमणूक करण्यात आलेल्या वास्तूविशारदातर्फे ड्रॉइंग आणि डिझाईन करण्यात आली आहे. त्यानुसार प्रा. मोरे प्रेक्षागृहाच्या नुतीकरणासाठी 20 कोटी रुपये इतका खर्च आला आहे. नुतनीकरणानंतर प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहच रसिकांच्या सेवेसाठी रुजू झाले आहे. या प्रेक्षागृहाच्या अंतर्गत भागातील भिंतींवर नाटक, लोककला, गायन आदी क्षेत्रातील तैलचित्रे लावून प्रेक्षागृहाची शोभा वाढविण्यात येणार आहे.

यासंदर्भात चित्रकार सुनील शेगावकर आणि प्रवीण गांगुडे यांच्याशी 22 ऑक्टोबर 2018 रोजी चर्चा झाली. त्यानंतर चित्रकार शेगावकर यांनी आपल्याकडील काही चित्रे दाखविली. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अन्य अधिका-यांनी सुचविलेल्या विषयांवर चार चित्रे काढून देण्याचे शेगावकर यांनी मान्य केले. चित्राच्या फ्रेमसह सुमारे आठ फूट बाय पाच फूट इतक्या आकाराचे एक तैलचित्र असणार असून प्रति चित्र अडीच लाख रुपये (जीएसटी व अन्य करांसह) इतका खर्च येईल, असे चित्रकार शेगावकर यांनी सांगितले. त्यामुळे शेगावकर यांच्याकडूनच चार तैलचित्रे रेखाटून घेण्यात येणार असून त्यासाठी दहा लाख रुपये इतका खर्च येणार आहे.

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या सीमाभिंतीवर अंतर्गत भागामध्ये ग्राफिकल पेंटींग म्यूरल रेखाटण्याचे काम प्रसिद्ध चित्रकार प्रवीण गांगुर्डे यांच्यावर सोपविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.