Pimple Gurav : चोरट्यांनी देवालाही सोडले नाही; तुळजाभवानी, कान्होबा मंदिरात चोरी

एमपीसी न्यूज – सांगवी परिसरातील तुळजाभवानी मंदिर, कान्होबा मंदिराच्या दरवाज्याचा कुलूप-कोयंडा तोडून चोरट्यांनी मंदिरातील मुर्तीसह दिवा, आरती, समई, घंटा, दानपेटीतील रोकड असा 32 हजारांचा ऐवज चोरून नेला. या दोन्ही घटना गुरूवारी मध्यरात्री पिंपळेगुरव भागात घडल्या. एकाच रात्री दोन मंदिरात चोरी झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. देवही सुरक्षित नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

पिंपळेगुरव येथील तुळजाभवानी मंदिरातील चोरी प्रकरणी अक्षय अनिल साळवे (वय 23, रा. लक्ष्मीनगर, पिंपळेगुरव) याला अटक केली आहे. याबाबत स्वप्निल श्रीकांत कदम (वय 26, रा. पिंपळेगुरव ) याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय याने गुरूवारी रात्री पिंपळेगुरव येथील तुळजाभवानी मंदिराच्या लोखंडी गेटचे कुलूप तोडले. मंदिरातील एक पितळी दिवा, आरती, चार समया, एक एलईडी टिव्ही आणि पितळी घंटा असा 12 हजार 700 रूपयांचा ऐवज चोरून नेला.

कान्होबा मंदिर चोरी प्रकरणी पुजारी सूर्यकांत ज्ञानोबा देवकर (रा. 60, रा. नेताजीनगर, पिंपळेगुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुजारी देवकर हे गुरूवारी रात्री मंदिर कुलूप लावून बंद करुन गेले होते. मध्यरात्री अज्ञात आरोपीने दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. मंदिरातील मूर्ती, पितळी तांब्या, पुजेचे साहित्य, दान पेटीतील रोकड असा 19 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. दोन्ही घटनांचा सांगवी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.