Pimpri : पीएमपीएमएलचे ‘ते’ कर्मचारी महापालिका सेवेत वर्ग

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) व्यवस्थापनातील 73 कर्मचा-यांना पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत वर्ग करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत रूजू करून घेतले असून प्रभाग, क्रीडा विभाग, स्वच्छ सर्वेक्षणचे काम त्यांना देण्यात आले आहे.

‘पीएमपीएमएल’ व्यवस्थापनातील 178 कर्मचारी महापालिकेच्या विविध संवर्गातील पदांवर सन 2000 पासून कार्यरत होते. मात्र, 2017 मध्ये ‘पीएमपीएमएल’चे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांनी या कर्मचा-यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश महापालिकेला दिले. त्यावर महापालिकेतील 178 कर्मचा-यांना कार्यमुक्त करून ‘पीएमपीएमएल’कडे वर्ग करण्यात आले होते.

तथापि, मुंडे यांची बदली झाल्यानंतर या कर्मचा-यांनी पुन्हा महापालिका सेवेत रूजू करून घेण्याची मागणी पदाधिका-यांकडे केली. याबाबत स्थायी समिती, महासभेत वारंवार चर्चा झाली. त्यानंतर 1 जानेवारी रोजी पीएमपीएमएलकडे सध्या रुजू असलेल्या 155 कर्मचा-यांपैकी 73 कर्मचा-यांना कार्यमुक्त केले आहे. या कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत रुजू करून घेण्यात आले असून प्रत्येक प्रभागात पाच कर्मचारी, क्रीडा विभागात तर काही कर्मचाऱ्यांना स्वच्छ सर्वेक्षणचे काम देण्यात आले आहे.

दरम्यान, उर्वरीत 82 कर्मचा-यांना आवश्यकतेनुसार कार्यमुक्त करण्यात येणार असल्याचे ‘पीएमपीएमएल’ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.