Chikhali : केवळ 10 हजार हुंडा दिला म्हणून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – लग्नात केवळ 10 हजार हुंडा दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी मंगळवारी (दि. 19) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 33 वर्षीच्या विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा दहा वर्षांपूर्वी आरोपीशी विवाह झाला आहे. लग्नानंतर केवळ 10 हजार रुपये हुंडा दिला. त्याव्यतिरिक्त काहीही संसार दिला नाही. दरम्यान आरोपीच्या भावाचे लग्न झाले. भावाच्या सासरकडच्या मंडळींनी लग्नात भरपूर सामान दिले. यावरून आरोपी फिर्यादी यांना वारंवार त्रास देत असे.

‘भावाच्या लग्नात त्याच्या सासरकडच्या लोकांनी संपूर्ण संसार दिला आहे.’ असे म्हणून आरोपीने फिर्यादी यांच्याकडे संसाराच्या सामानाचे पैसे आणण्याचा तगादा लावला. फिर्यादी यांनी यासाठी नकार दिला असता आरोपीने फिर्यादी यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.