Chinchwad : लोकल रद्द केल्याने प्रवासी संतप्त (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- लोणावळ्याहून पुण्याच्या दिशेने जाणारी लोकल अचानक चिंचवड स्टेशन येथे दाखल झाली असता ही लोकल गाडी पुण्याकडे रवाना होणार नसल्याचे जाहीर होताच संतप्त प्रवाशांनी चिंचवड रेल्वेस्थानकामध्ये गोंधळ घालत स्टेशन मास्तरांना घेराव घातला. हा प्रकार आज, बुधवारी दुपारी साडेबारा वाजता चिंचवड रेल्वेस्थानकात घडला. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी लोणावळा येथून पुण्याकडे लोकल रवाना झाली. चिंचवड रेल्वेस्थानकात दुपारी साडेबाराच्या सुमारास लोकल गाडी दाखल होताच ही गाडी पुण्याच्या दिशेने जाणार नसून ती रद्द करण्यात आल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली. गाडी रद्द करण्यात आल्याचे समजताच प्रवाशांमध्ये संताप पसरला. संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तरांना घेराव घालून गाडी पुढे सोडण्याची मागणी केली. मात्र गाडी पुढे सोडण्यात येऊ शकत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. कोणतीही पूर्वसूचना न देता लोकल रद्द केल्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाली.

संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तरांना घेराव घालून गाडी पुढे सोडण्याची मागणी केली. मात्र दापोडी आणि खडकी रेल्वेस्थानकाच्या दरम्यान ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे गाडी पुढे जाऊ शकत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. अखेर दुपारी दीड वाजता लोकल पुण्याच्या दिशेने रवाना झाल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.