Pune: गाईचे दूध सोमवारपासून प्रतिलिटर दोन रुपयांनी महाग

एमपीसी न्यूज – गाईच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ झाल्याने येत्या १६ डिसेंबरपासून (सोमवार) दुधाच्या प्रतिलिटर पिशवीचा दर दोन रुपयांनी वाढणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कल्याणकारी संघाच्या बैठकीनंतर येथे देण्यात आली. कात्रज दूध संघात, दूध व्यावसायिकांच्या झालेल्या या बैठकीनंतर ही माहिती पत्रकारांना देण्यात आली.

या बैठकीला सहकारी आणि विविध खासगी दूध संघाचे सुमारे दीडशे पदाधिकारी उपस्थित होते. या निर्णयानंतर शेतकऱ्यांचा खरेदी दर रु. २० तर एफआरपीमध्ये दोन रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला. राज्यांतर्गत वापरासाठी ८५ लाख लिटर दूध पॅकिंगमध्ये विकले जाते. ग्राहकांना मात्र या निर्णयामुळे मोठा भुर्दंड बसणार आहे.

या घडामोडीबाबत एमपीसी न्यूजशी सविस्तर बोलताना विवेक क्षीरसागर, कार्यकारी संचालक, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यांनी सांगितले की या दरवाढीचा फटका ग्राहकाला बसणार असून तो दुधाला पर्याय शोधू लागेल व अंतिमतः आपला दुधाचा वापर कमी करेल किंवा मर्यादित करेल. ग्राहकांनी तसे केले तर आज जो दुधाचा वापर आहे, तो मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे दूध उत्पादन जास्त होईल. या अधिक दुधाचे काय करायचे, असा मोठा प्रश्न राज्यातील दूध उत्पादकांसमोर उभा राहील व याचाच परिणाम म्हणून दूध व्यवसायाकडे वळणारे दूध उत्पादक उद्या या व्यवसायाकडे पाठ फिरवतील. या दुष्टचक्रात राज्यातील दूध उत्पादक सापडला तर त्याचा फायदा घ्यायला कर्नाटक व गुजरातसारखी राज्ये वाटच पाहत आहेत. त्यामुळे आपल्या, महाराष्ट्राच्या दूध उत्पादकांवर, उत्पादनावर दुसऱ्या राज्यांचा दबाव राहील व आपला दूध व्यवसाय रसातळाला जाईल. म्हणूनच राज्य सरकारने दूध व्यवसायाच्या हिताचा साकल्याने विचार करणे व राज्यातील दूध व्यावसायिकांनी एकी दाखवून आपल्या दूध व्यवसायाची धोरणे निश्चित करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

दूध दरवाढीच्या समस्येवरील उपायांबाबत बोलताना क्षीरसागर म्हणाले की अन्य राज्यांसारखी महाराष्ट्र सरकारने जर दुधावर ६ रुपये प्रतिलिटर अनुदान दूध उत्पादकांना दिले, तर आपणही गाईचे दुधाची पिशवी प्रतिलिटर ४० रुपये प्रतिलिटर या दराने देऊ शकतो. नवीन सरकार या विषयावर सकारात्मक आहे. आम्ही त्यांच्याशी याबाबत बोलणी करीत आहोत.

या बैठकीला राजाराम पाटील दूध संघ, बारामती, सोनाई, चितळे, पराग, नगरसह इतर जिल्ह्यांतील दूध व्यावसायिक उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.