Pimpri: मध्यरात्रीपासून लॉकडाऊन! ‘अव्वाच्या सव्वा’ भावाने भाजी विक्री

Pimpri: Lockdown from midnight! Vegetables sold by higher rates टोमॅटोचा भाव 40 रुपयांवरून एकदम 80 रुपये प्रतीकिलो

एमपीसी न्यूज – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात आज (सोमवारी) मध्यरात्रीपासून दहा दिवस लॉकडाऊन असणार आहे. परंतु, याची नामी संधी साधत किरकोळ विक्रेत्यांनी ‘अव्वाच्या सव्वा’ भावाने भाजी विक्री सुरु केली आहे. भाजीपाल्यांचे दुप्पट भाव केले आहेत. 40 रुपयांचे टोमॅटो 80 रुपये किलोने विक्री केली जात आहेत. त्याचा गृहिणींना मोठा फटका बसत आहे. लॉकडाऊनमुळे अगोदरच कोलमोडलेल्या आर्थिक नियोजनावर त्याचा परिणाम होत आहे.

आज सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरु होणार आहे. भाजी मंडई, फळ विक्रेते, दैनंदिन बाजार, फेरीवाले 14 ते 18 पर्यंत पूर्ण बंद राहणार आहे. तर, 19 ते 23 पर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत सुरु राहणार आहेत. लॉकडाऊनच्या धास्तीने नागरिकांनी भाजी खरेदीसाठी गर्दी केली आहे. भाजीपाला बाजारात टोमॅटोची आवक असतानाही, अचानक एका दिवसांत  भाव गगनाला भिडले आहेत.

प्रतिकिलो 30 रुपये असलेला टोमॅटोचे भाव आता 80 रुपयांच्या घरात पोचले आहेत. 20 रुपये प्रतिकिलो बटाटा 50 रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे टोमॅटो खरेदी करताना प्रतिकिलोमागे 50 रुपये जादा भाव गृहिणींना मोजावे लागत आहे. इतर भाजीपालाही किमान 60 रुपये किलोच्या घरात आहे. नागरिकांची होणारी गर्दी पाहता किरकोळ भाजी विक्रेत्यांनी भाजीपाल्यांचे भाव वाढविले आहेत. रस्त्यावर अनेक भाजी विक्रेत्यांनी दुकाने मांडली आहेत.

वांगी 60 रुपये, गवार 80 रुपये, भेंडी 40 रुपये, कारली 40 ते 60 रुपये, फ्लॉवर 60 रुपये, कोबी 40 रुपये, दोडकी 40 रुपये, सिमला मिरची 40 रुपये किलो याप्रमाणे दर आहेत. तर कांदा 40 रुपये किलो, बटाटा 50 रुपये, हिरवी मिरची 80 रुपये, आले 80 ते 90 रुपये, लसूण 100 रुपये किलो आहे. नागरिकांची गरज ओळखून तसेच नागरिकांच्या गरजेचा फायदा घेण्यासाठी अनेकांनी रस्त्यांवर भाजीपाला तसेच फळे विक्रीची दुकाने थाटल्याचे पहायला मिळाले. वाटेल त्या भावाने हे दुकानदार नागरिकांना लुटत होते.

स्वीट होमसमोर गर्दी

दहा दिवस लॉकडाऊन राहणार असल्याने नागरिकांनी विविध खाद्यपदार्थ घेण्यासाठी स्वीट होमसमोर गर्दी केली होती. फरसाण, वेफर्स, लाह्यांचे पुडे, वेगवेगळ्या प्रकारचे तळलेले पदार्थ नागरिक खरेदी करताना दिसले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.