Dehuroad News : घोरावडेश्वर डोंगरावर वृक्ष संवर्धन आणि व्यायामासाठी जाण्यास रोखू नये : वृक्षप्रेमींची मागणी

एमपीसीन्यूज : घोरावडेश्वर डोंगरावर तसेच लगतच्या वनक्षेत्रात प्रवेश करण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. वन संपत्ती आणि वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. मात्र, घोरावडेश्वर डोंगर परिसरात 500 वृक्ष लागवड केलेली आहे. त्याची निगा राखण्यासह तेथे व्याव्यामासाठी जाण्यापासून रोखू नका, त्यासाठी ओळखपत्र द्या, अशी मागणी निसर्ग प्रेमी व जंगल ग्रुपच्या सदस्यांनी केली आहे.

यासंदर्भात मावळचे आमदार सुनील शेळके व राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे देहूरोड शहराध्यक्ष ॲड. कृष्णा दाभोळे, अशोक घारे, सुभाष जाधव, धनंजय मोरे, ॲड. जालिंदर राऊत, संजय दांगट, तुळशीराम गायकवाड, संभाजी ठोंबरे, मोहन शिंदे, मयूर झोडगे आदींनी केली. या ग्रुपच्या शिष्टमंडळाने वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांची सोमवारी ( दि. 5) प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

देहूरोड, शितळानगर, मामुर्डी, साईनगर, किवळे, गहुंजे, शेलारवाडी, सोमाटणे या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना व्यायाम करण्यासाठी तसेच निसर्ग प्रेमी वृक्ष लागवड आणि वृक्ष ससंवर्धन करण्यासाठी नियमित घोरावडेश्वर डोंगर, मृगन टेम्पल आदी परिसरात जात असतात.

आतापर्यंत परिसरातील निसर्गप्रेमींनी 500 वृक्ष या परिसरात लावले आहेत. या वृक्षांची नियमित देखभाल व संवर्धन करण्याचे काम अव्याहतपणे सुरु आहे.

यामध्ये निसर्ग प्रेमी, झाडे लावा झाडे जगवा आणि जंगल ग्रुप असे विविध ग्रुप मध्ये सेवानिवृत्त नागरिक, माजी सैनिक, केंद्रीय कर्मचारी, राज्य कर्मचारी, वयोवृध्द, महिला,युवक, युवती गेली 20 ते 25 वर्ष झाले  या डोंगरावर रोज पायी चालणे व व्यायाम करण्यासाठी येतात.

मात्र, काही दिवसांपूर्वी वनविभागाच्या नियतक्षेत्र अधिकारी रेखा वाघमारे यांनी वन संपत्ती आणि वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी तसेच घोरावडेश्वर परिसरातील वन हद्दीत गैरप्रकार होऊ नयेत यासाठी सर्व नागरिकांना घोरावडेश्वर परिसरात प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे. तसेच कारवाईचा इशाराही दिला आहे.

वनविभागाने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे. त्यामुळे वन हद्दीतील गैरप्रकार रोखण्यासह वनसंपत्तीचे नुकसान आणि गैरप्रकार रोखण्यास मदतच होणार आहे.

परंतु, नियमित व्यायामासाठी आणि वुक्षसंवर्धनसाठी येणाऱ्या नागरिकांना परिसरात जाण्यापासून रोखणे योग्य नाही. उलट या नागरिकांना ओळखपत्र देऊन प्रवेश दिला जावा, अशी मागणी शिष्टमंडळाने वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांच्याकडे केली.

सकाळी 9 ते सायंकाळी 5  वाजेपर्यंत या भागामध्ये गैरप्रकार करताना आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यास आमची काहीही हरकत नसल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. व्यायाम आणि वृक्ष लागवडीसाठी सकाळी आणि संध्याकाळची वेळ ठरवून यासाठी सदस्यांना ओळखपत्र देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

वनक्षेत्राच्या संरक्षण व संवर्धन कामाकरिता हरित सेने अंतर्गत नोंदणी करून घ्यावी. वरिष्ठ कार्यालयाकडून त्यांना त्वरित ओळखपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे जबाबदार नागरिकांना वनाचे संरक्षण व संवर्धन कामी वनविभागास आवश्यक योगदान देता येईल. तसेच गैरप्रकारांना अटकाव घालता येईल. सोमनाथ ताकवले-वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव मावळ.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.