Mumbai News: नवीन कोरोना विषाणू ! चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा – मुख्यमंत्री
एमपीसी न्यूज – नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहावे. चाचण्यांचे प्रमाण वाढवावे आणि मास्कचा वापर बंधनकारक करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे.
त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहावे. चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा. पुढचा धोका लक्षात घेऊन जागरुक राहण्याचे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
आजपासून महापालिका क्षेत्रात संचारबंदी !
आजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 अशी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकाळात अनावश्यक रहदारी टाळावी, असे आवाहन करतानाच आंतरराष्ट्रीय प्रवास केलेले प्रवासी देशांतर्गत प्रवास करुन महाराष्ट्रात येतात. विविध राज्यातून येणाऱ्या अशा प्रवाशांकडे लक्ष द्यावे. त्यांच्याबाबतीत जागरूकता ठेवावी. त्यासाठी दिल्लीसह इतर राज्यांशी, प्रशासनाशी समन्वय साधावा, असे आवाहनह मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्ह्याचे पोलीस अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. कोरोना स्थिती, कोरोना विषाणूचा दुसरा प्रकार व त्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, लसीकरणाची तयारी आदीबाबत त्यांनी आढावा घेतला.
यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास, राज्य टास्कफोर्सचे सदस्य डॉ.शशांक जोशी आदी उपस्थित होते.