Pimpri News: ‘मास्क घोटाळा’ गाजत असतानाच आता झोपडपट्ट्यांमध्ये सॅनिटायझर, हॅन्डवॉश वाटणार

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीत शहरातील झोपडीधारकांना वाटलेल्या मास्कमधील ‘कोरोना कमिशन’चे भ्रष्टाचार प्रकरण गाजत असतानाच आता झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता किट वाटल्या जाणार आहेत. यामध्ये सॅनिटायझर बाटल्या, फरशी पुसण्यासाठी लाईझॉल, हॅन्डवॉश, नॅपकिन, कापडी मास्कचे वाटप केले जाणार आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ या संस्थेस थेट पद्धतीने हे साहित्य खरेदी करण्यास स्थायी समितीने उपसूचनेसह मान्यता दिली आहे. मास्कप्रमाणेच यामध्ये भ्रष्टाचाराला मोठा वाव असल्याचे दिसून येते.

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने महापालिकेने मागीलवर्षी कोणतीही निविदा न मागविता, करारनामा न करता पुरवठाधारकांकडून थेट पद्धतीने कापडी मास्क खरेदी केले होते. एक मास्क दहा रुपयांना खरेदी केला होता. भाजप आणि राष्ट्रवादी नगरसेवकांच्या संस्थाकडूनच झोपडीधारकांसाठी मास्कची खरेदी केली होती. त्या मास्कचा दर्जा अतिशय निकृष्ट होता. तसेच मास्क वाटूनही झोपडपट्टीतील कोरोना नियंत्रणात राहिला नव्हता. आता पुन्हा स्वच्छता किट वाटले जाणार आहेत.

शहरात 37 घोषित आणि 34 अघोषित अशा 71 झोपडपट्ट्या आहेत. त्यात 49 हजार 83 झोपड्या असून सुमारे दोन लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे.

झोपडपट्टीवासियांचे आरोग्य उत्तम राहण्याकरिता, कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी झोपडपट्टीतील कुटुंबाना स्वच्छता किट वाटण्यात यावे. त्यामध्ये चार सॅनिटाझर हॅन्डी बाटल्या (सुगंधित), फरशी पुसण्यासाठी 1 लाईझॉल, 2 हॅन्डवॉश, 2 नॅपकिन आणि 10 कापडी मास्क पुरविण्यात यावेत. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ या संस्थेस थेट पद्धतीने देण्यात यावे. ही खरेदी शहर सुधारणा विभागामार्फतच करण्यात यावे असा ठराव 2 मार्च रोजीच्या शहर सुधारणा समितीने मान्य केला.

हे साहित्य यशवंतनगर, नेहरुनगर येथील राजीव गांधीनगर, साईनाथनगर, आंबेडकरनगर, लालटोपीनगर येथील झोपडपट्ट्यात वाटण्यास मान्यता दिली होती.

त्याला स्थायी समितीने उपसूचना देत शहरातील सर्व झोपडपट्ट्यातील कुटुंबांना हे साहित्य पुरविण्यास आणि त्यासाठी येणा-या खर्चास मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.