Pimpri corona News : कोविड सेंटरमधील सावळा गोंधळ (भाग दोन) ; मृत रुग्णांच्या मौल्यवान साहित्याची चोरी, स्वच्छतेकडे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज (प्रमोद यादव) – जम्बो कोविड सेंटरमध्ये मृत झालेल्या रुग्णांना त्यांच्या मौल्यवान वस्तू परत दिल्या जात नाहीत असा आरोप नातेवाईकांनी केला. रुग्णांच्या वस्तू चोरीला जात आहेत यामध्ये मोबाईल, पैश्याच्या पाकीटांवर डल्ला मारला जात आहे. लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू चोरीला किंवा गहाळ कशा होतात, असा सवाल रुग्णांचे नातेवाईक उपस्थित करत आहेत. तसेच, सेंटरमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे रुग्णांनी सांगितले.

वैष्णवी खुळे यांच्या मामांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर आजपर्यंत त्यांना मृत रुग्णांचे साहित्य मिळवण्यासाठी कोविड सेंटरच्या फे-या माराव्या लागत आहेत. याबाबत आपला अनुभव सांगताना वैष्णवी खुळे म्हणाल्या, ‘माझ्या मामांना 24 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली. ऑक्सिजनची गरज असल्याने त्यांना वायसीएममधून नेहरू नगर कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले.

30 एप्रिल रोजी त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी हलवले व 1 तारखेला त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे साहित्य मिळवण्यासाठी आम्हाला अजून फे-या माराव्या लागत आहेत. मोबाईल व पाकीट (त्यामध्ये पैसे, बँक कार्ड व इतर महत्वाची कागदपत्रे) अजूनही आम्हाला मिळाले नसल्याचे खुळे म्हणाल्या.

‘जम्बो कोविड सेंटरमध्ये मृत झालेल्या कोणत्याच रुग्णाचे पाकीट, मोबाईल व मौल्यवान ऐवज नातेवाईकांना दिला जात नाही अशी तक्रार अनेकजण करत आहेत. तर हे साहित्य मागितले असता रुग्णालय प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत, असे खुळे यांनी सांगितले.

कोविड सेंटरमधील अस्वच्छता आणि नादुरुस्त उपकरण असल्याची तक्रार उपचारानंतर बरे झालेल्या धनश्री पाटील यांनी केली. पाटील म्हणाल्या, ‘माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर मी नेहरूनगरच्या कोविड सेंटरमध्ये दाखल झाले. सुरवातीला काही तास मला चादरच मिळाली नाही. येथील स्वच्छतागृह आणि स्नानगृहांची अवस्था दयनीय आहे. त्यांची नियमित स्वच्छता केली जात नाही. आठ दिवसांत मी एकदाच स्वच्छतागृहाचा वापर केला’, असे त्या म्हणाल्या.

उपचारासाठी दाखल झाल्यापासून डिस्चार्ज मिळेपर्यंत त्याठिकाणचा फॅन खराब होता. तुटलेल्या सॉकेटमध्ये वायर जोडून फॅन सुरू केला. माझ्यावर करण्यात आलेले उपचार, त्यासाठी वापरलेली औषध यांची माहिती देखील मला दिली नसल्याचे’ धनश्री पाटील म्हणाल्या.

दरम्यान, कोविड सेंटरमधून वस्तू चोरीला जात असतील तर संबंधितांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले आहे.

साईकिरण ईला यांच्या वडिलांना 21 एप्रिल रोजी नेहरुनगर कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. साईकिरण यांनी सेंटरची व्यवस्था आणि कर्मचारी यांच्या बाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट देखील लिहिली आहे.

साईकिरण म्हणाले, ‘वडिलांना दवाखान्यात दाखल करुन 10 दिवस उलटले तरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही. येथील कर्मचारी त्यांची कामं जबाबदारीने करीत नाहीत. डॉक्टर एक्स-रे, ब्लड रिपोर्ट काढण्यास सांगतात. पण एक्स-रे, ब्लड रिपोर्ट काढले जात नाहीत. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून हात धुवायला देखील पाणी उपलब्ध नाही.

दरम्यान, येथील व्यवस्थेला कंटाळून आम्ही वडिलांना सोमवारी (दि.03) खासगी रुग्णालयात हलविले असं साईकिरण यांनी सांगितले.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे  शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी जम्बो कोविड रुग्णालयाची पाहणी केली. ‘जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रारी येऊ देऊ नका, रुग्णांवर व्यवस्थित उपचार करावेत. ज्या काही त्रुटी असतील त्या तत्काळ दूर कराव्यात, अशा सूचना खासदार बारणे यांनी कोविड रुग्णालय प्रशासनाला केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.