Pimpri News: स्थायी समिती अध्यक्षांचा जामीन अर्ज फेटाळला, न्यायालयीन कोठडी

एमपीसी न्यूज – लाच प्रकरणात तात्पुरत्या जामिनीवर सुटलेले पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांचा जामीन कायम करायला विशेष न्यायालयाने नकार दिला.

लांडगे यांनी तात्पुरत्या जामीनासाठी आजी (आईची आई) ताराबाई बोऱ्हाडे या मयत झाल्याचे कारण दिले होते. मात्र, ताराबाई बोऱ्हाडे या लांडगे यांच्या वडिलांची मावशी असल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी न्यायालयाला खोटी माहिती देऊन तात्पुरता जामीन मिळावल्याचे दिसून येत असल्याचे ‘एसीबी’ पोलिसांनी न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने लांडगे यांना जामीन देण्यास नकार देत न्यायालयीन कोठवडी सुनावली.

वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठीचे 1 लाख 18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्थायीच्या कर्मचाऱ्यांना एसीबीने बुधवारी (दि.18) महापालिका मुख्यालयात रंगेहाथ पकडले. समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया, (पद लिपिक) , राजेंद्र जयवंतराव शिंदे (संगणक ऑपरेटर) आणि अरविंद भिमराव कांबळे, (पद शिपाई) यांना पोलिसांनी गुरुवारी (दि.19) पहाटे अटक केली. न्यायालयाने आरोपींना 21 ऑगस्टपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

त्यानंतर पुन्हा 23 ऑगस्टपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. 23 ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तर, स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना गुरुवार (दि.26) पर्यंत तात्पुरता जामीन दिला होता. जामिनीची मुदत संपल्याने लांडगे आज शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर झाले. त्यांचा जामीन कायम करायला एसीबी पोलिसांनी विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून लांडगे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जामिनीला विरोध करण्यासाठी न्यायालयाला कारणे दिली होती. त्यात नितीन लांडगे हे मार्च 2021 पासून स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. पडताळणी कारवाईमध्ये फिर्यादीने लांडगे यांचे स्वीय सहाय्यक पिंगळे यांच्यासोबत भेट घेतली असता 3 टक्के ऐवजी 2 टक्केप्रमाणे पैसे देण्याबाबत चर्चा केली. लांडगे यांनी ‘ठिक आहे दो से करो, दोन ने करुन टाका ओके’ असे म्हणून आदेश दिला. त्यानुसार सहा फाईल्सचे दोन टक्यांप्रमाणे 1 लाख 18 हजार रुपयांची लाच शिपाई कांबळे यांनी स्वीकारली. लांडगे यांच्या राजकीय दबावामुळे त्यांना जामीन मंजूर झाल्यास गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर दबाव येण्याची दाट शक्यता आहे. गुन्ह्याच्या पडताळणीमध्ये उल्लेख झालेले ते 16 जण म्हणजेच स्थायी समितीचे 16 सदस्य यांच्याकडे चौकशी करणे बाकी आहे. त्यांच्यात व अटक केलेल्या 5 आरोपी यांच्यात काही रॅकेट आहे का, याबाबत तपास करणे आहे. या गुन्ह्याच्या सखोल तपास करणे बाकी आहे. गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन कोर्टामध्ये दोषरोप दाखल करणे बाकी आहे.

लांडगे यांनी 23 ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर पी.आर. बॉन्डवर सुटताना आजी (आईची आई) ताराबाई बाबूराव बो-हाडे रा. मोशी, बोऱ्हाडेवाडी या मयत झाल्याचे कारण दिले होते. मात्र, ताराबाई बोऱ्हाडे या प्रत्यक्षात नितीन लांडगे यांच्या वडिलांची मावशी असल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी न्यायालयाला खोटी माहिती देऊन तात्पुरता जामीन मिळावल्याचे दिसून येत असल्याचे ‘एसीबी’ पोलिसांनी न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने लांडगे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.