Ind vs Ing Test : भारताने मिळवला इंग्लंडवर ओव्हलमध्ये आतापर्यंतचा मोठा विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – लंडनच्या ओव्हल मैदानावर चालू असलेल्या या चौथ्या सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजानी केलेल्या तुफानी गोलंदाजीमुळे इंग्लंडचा डाव कोसळला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये ओव्हल मैदानावर आजवरच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय मिळवला. सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली असली तरी जसप्रीत बुमराह हा विजयाचा मुख्य शिल्पकार ठरला, जुन्या चेंडूवर त्याने अप्रतिम स्विंग, यॉर्कर्स टाकत आपल्या नावाचा अल्पावधीतच का दबदबा झालाय याचे सोदारहण प्रत्यंतर दिले.

पाचव्या आणि शेवटच्या दिवशी नाबाद 77 वरून पुढे खेळताना इंग्लिश सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली होती. बरोबर शतकी भागीदारी झाल्यानंतर मात्र या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या आणि अल्पावधीतच द लॉर्ड्स नावाने उल्लेख होत असलेल्या शार्दुल ठाकूरने रॉरी बर्न्सला पंतद्वारे झेलबाद करून इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या डेव्हिड मलानने हबीब बरोबर जेमतेम 20 धावांची भागीदारी केली आणि तो केवळ 5 धावा काढून धावबाद झाला.

या दरम्यान हबीबला जडेजाच्या एका षटकात सिराजकडून जीवदान मिळाले खरं, पण तो त्याचा काहीही खास फायदा उठवू शकला नाही, त्याला अगदी थोड्याच वेळात जडेजाने त्रिफळा बाद करत इंग्लंडला तिसरा मोठा धक्का दिला.

हबीबने चांगली खेळी करताना 63 धावा केल्या खऱ्या, पण जम बसल्यानंतरचे त्याचे बाद होणे इंग्लंड संघाला परवडलेच नाही आणि यानंतर सुरू झाला ‘द जसप्रीत बुमराह शो’!

त्याने दोन अप्रतिम चेंडू टाकून पहिल्या डावातला सर्वाधिक धावा बनवणाऱ्या पोप आणि त्याच पाठोपाठ जॉनी बेअरस्टोला वेगवान यॉर्करवर त्रिफळा बाद करत इंग्लंड संघाचा पाचवा गडी बाद करत मोठा धक्का दिला.

त्यानंतर इंग्लंड संघ सावरला नाही तो नाहीच. हा दुसऱ्या बाजूने या मालिकेत सर्वाधिक धावा बनवणारा कर्णधार जो रूट खेळत होता पण तोपर्यंत भारताला मोठा विजय खुणावत होता.

दुसऱ्याच षटकात जडेजाने मोईन अलीला राखीव खेळाडू सूर्यकुमारद्वारे शून्यावर तंबूत पाठवले आणि या सामन्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या ठाकूरने रुटला 36 धावांवर त्रिफळाबाद करत इंग्लिश समर्थकांच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आणल्या आणि उरलेले काम फत्ते पाडत उमेश यादवने पूर्ण करत इंग्लंड संघाला केवळ 210 धावांवर सर्वबाद करत एक मोठा विजय मिळवला आणि मालिकेत आता दोन विरुद्ध एक अशी विजयी आघाडी मिळवली, आणि सोबत विक्रमाच्या पुस्तकात मानाचे स्थानही.

जसप्रीत बुमराहने पोपला त्रिफळा बाद करत आपला 100वा कसोटी बळी केवळ चोवीसाव्या कसोटीत मिळवून भारतातर्फे सर्वाधिक जलदगतीने 100 कसोटी बळी मिळवण्याचा सन्मान मिळवला. रोहित शर्माने आपले आठवे आणि भारताबाहेरचे पहिले कसोटी शतक झळकावले.

शार्दुल ठाकूरने दोन्ही डावात अर्धशतके झळकावत गोलंदाजीतही दोन्ही डावात मिळून तीन बळी घेत अष्टपैलू कामगिरी केली, तर पुनरागमन करताना उमेश यादवने सुद्धा दोन्ही डावात मिळून सहा बळी मिळवून आपले नाणे खणखणीतरित्या वाजवून सर्वांचे लक्ष वेधून घेणारी कामगिरी केली. अशी सांघिक कामगिरी असली तरी आपल्या शतकाने संघाला मजबूत स्तिथीत आणून ठेवणारा रोहित शर्माच सामनावीर ठरला.

आता दहा तारखेपासून सुरू होणाऱ्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघ असाच विजय मिळवून मालिका खिशात टाकण्यासाठी जसा उत्सुक असेल तसेच तुम्ही आणि मीही, नाही का?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.