Pimpri News: लाचखोरीनंतर स्थायीच्या बैठकीत सर्वपक्षीय सामील, तब्बल 44 कोटींच्या विषयांना मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतील लाचखोरी प्रकरण अवघ्या 22 व्या दिवशी पूर्णपणे शमले. दोषींवर कारवाईची भाजप प्रदेशाध्यक्षांची घोषणा पोकळ ठरली.

तर, स्थायी समिती बरखास्त करा. यापुढे आमचे सदस्य सभेत सहभागी होणार नाहीत, अशी वल्गना करणा-या राष्ट्रवादीने अक्षरशः माघार घेतली. सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी, शिवसेनेचे सदस्य आज (बुधवारी) झालेल्या स्थायीच्या सभेत सहभागी झाले. सर्वांनी मिळून खेळीमेळीच्या वातावरणात तब्बल 44 कोटी रुपयांच्या विषयांना मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) ऑनलाइन पार पडली. अॅड. नितीन लांडगे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. विषयपत्रिकेवरील सर्वच म्हणजेच 29 विषयांना मान्यता दिली. याशिवाय आयत्यावेळच्या सहा अशा तब्बल 43 कोटी 98 लाख 52 हजार 202 रुपयांच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली.

बरोबर 22 दिवसांपूर्वीच म्हणजे 18 ऑगस्ट रोजी महापालिका इतिहासात अभूतपूर्व घटना घडली. महापालिका मुख्यालयात पोलिसांनी धाड टाकत स्थायी समिती अध्यक्षांसह पाच जणांना लाचप्रकरणी अटक केली. यावरुन विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने भाजपला घेरले. स्थायी समिती बरखास्त करा, अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली. मागील दोन बुधवारी महापालिकेत आंदोलन केले. लाचखोरीचे प्रकरण घडल्यापासून राष्ट्रवादीचे चार सदस्य सभेत सहभागी झाले नाहीत. आणि यापुढे होणार नाहीत, आम्ही बहिष्कार टाकणार आहोत, असे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी जाहीर केले.

परंतु, बरोबर आठव्या दिवशी राष्ट्रवादीने यू-टर्न घेतला. राष्ट्रवादीची भूमिका बदलली. राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही सदस्य आजच्या स्थायीच्या सभेत सामील झाले. एकाही विषयाला विरोध दर्शविला नाही. सर्व विषयांच्या मान्यतेला सहमती दिली. आम्हाला सभेत सहभागी होण्याचा दुपारी उशिरा निरोप मिळाला. आम्हाला विषयपत्र वाचता आले नाही. त्यामुळे विषयाला विरोध करता आला नसल्याचे अजब स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या स्थायीतील सदस्यांनी दिले. त्याचबरोबर शिवसेनेच्या सदस्यानेही सभेत सहभाग घेतला.

स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे म्हणाले, ”आजच्या सभेत सर्वपक्षीय 16 नगरसेवक सहभागी झाले होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली. 44 कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता दिली. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी एकाही विषयाला विरोध दर्शविला नाही. पाणीपुरवठ्यावर चर्चा झाली. सणासुदीच्या काळात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची सूचना प्रशासनाला केली. डेग्यूबाबत उपाययोजना कराव्यात. दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्तांना दिले आहेत”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.