IPL 2022 NEWS : केकेआरचे आयपीएल 2022 मधले आव्हान 2 धावांच्या पराभवाने आणले संपुष्टात

लखनऊ नंबर 2 वर थाटात विराजमान

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) कोलकाता संघावर केवळ दोन धावांनी मात करत लखनऊ संघाने मिळवले प्ले ऑफ मधे द्वितीय स्थान कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघात झालेल्या कालच्या सामन्यात लखनऊ सुपर संघाने प्रथम फलंदाजी करत डीकॉकच्या दणकेबाज शतकामुळे 210 धावांचा डोंगर रचला आणि नंतर केकेआर वर केवळ दोन धावांनी चित्तथरारक मात मिळवत प्ले ऑफ मधली आपली जागाही सुनिश्चित केली आहे.याचवेळी मात्र या पराभवाने माजी आयपीएल विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचे या स्पर्धेतले आव्हान यावर्षी तरी संपुष्टात आलेले आहे.

लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार के एल याने नाणेफेक जिंकतात पहले आप न म्हणता पहले हम म्हणत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि डीकॉकच्या साथीने नाबाद 210 धावांची मोठी आणि विक्रमी भागीदारी करून कोलकाता नाईट रायडर्स समोर मोठे आव्हान ठेवले, या जोडीने जबरदस्त फलंदाजी करताना अखेरपर्यंत आपल्या विकेट्स सांभाळून ठेवल्या आणि केकेआरच्या गोलंदाजांना पूर्णपणे निष्प्रभ करत द्विशतकी सलामीची विक्रमी भागीदारीही नोंदवली.डीकॉकने आपल्या आयपीएल करीयरमधली सर्वोच्च  धावसंख्या रचताना 70 चेंडूत 200च्या स्ट्राईकरेटने नाबाद 140 धावा करताना 10 चौकार आणि 10 षटकार मारले.

तो बऱ्यापैकी नशीबवानही ठरला,त्याला एक दोन नाही तर तब्बल तीन जीवदान मिळाले,ज्याचा त्याने जबरदस्त फायदा उचलत केकेआरच्या गोलंदाजांला रडकुंडीला आणले,त्याला के एल राहुलनेही चांगली साथ देताना 51 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार मारत नाबाद 68 धावा केल्या.केकेआरचा एकही गोलंदाज ही जोडी फोडू शकला नाही.

या मोठया आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात लखनऊ संघाच्या अगदीच विपरीत झाली.वेंकटेश अय्यर डावाच्या पहिल्या षटकात भोपळा न फोडताच मोहसीन खानच्या गोलंदाजीवर बाद झाला.अन या धक्क्यातून सावरण्याआधीच मोहसीननेच अभिषेक तोमरला आपल्या तिसऱ्या षटकात वैयक्तिक चार धावांवर बाद करुन केकेआरची अवस्था दोन बाद 9अशी बिकट करुन टाकली.

या बिकट परिस्थितीतून कर्णधार श्रेयस अय्यर आणि नितीश राणा या जोडीने आक्रमण करत लढाई चालू ठेवली, दोघेही फलंदाज जोरदार खेळत आहेत असे वाटत असतानाच नितीश राणा वैयक्तिक 42 धावा करून गौथमच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला,त्याने 22 चेंडूत 9 चौकार मारत 42 धावा केल्या,आणि श्रेयस सोबत तिसऱ्या गड्यासाठी 56 धावांची भागीदारीही केली,यानंतर आलेल्या सॅम बिल्लिंगने श्रेयसला चांगली साथ दिली,श्रेयसने जबरदस्त टोलेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण करताना केवळ 29 चेंडू घेतले,ज्यात 4 चौकार आणि तीन षटकार सामील होते,

मात्र अर्धशतक झाल्या झाल्या तो स्टोयनिसच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि केकेआरला मोठा धक्का बसला.पाठोपाठ सॅमही  36 धावा करून रवी बिष्णोईच्या तर खतरनाक रसेल सुद्धा फक्त 5 धावा करुन मोहसीनची शिकार झाला आणि केकेआरची अवस्था 17 व्या षटकात 6 बाद 150 अशी झाली आणि केकेआर मोठ्या धावसंख्येने आज मात खाणार असे वाटायला लागले.

याचवेळी नवोदित रिंकू सिंगने चमत्कारी आणि अविस्मरणीय फटकेबाजी सुरू करत सामन्याचे चित्रच बदलून टाकले,त्याच्या या अविश्वसनिय फलंदाजीने एक वेळ केकआर सामना जिंकेल असेच खात्रीपूर्वक वाटायला लागले होते, आणि लखनऊच्या गोटात अस्वस्थता वाढायला लागली होती,शेवटच्या सहा चेंडूत 21 धावा हव्या असताना रिंकूने अनुभवी स्टोयनिसवर भारी पडत पहिल्या चार चेंडूवर 4,6,6 आणि दोन धावा काढत सामन्यात सनसनाटी निर्माण केली आता दोन चेंडू आणि तीन धावा अशी परिस्थिती निर्माण झाली होती, यावेळी केकेआर सहज जिंकेल असे वाटत असतानाच स्टोयनिसच्या 5 व्या चेंडूवर एक उत्तुंग फटका मारण्याच्या नादात रिंकूचा अप्रतिम झेल एविन लेविसने घेतला आणि तो झेल पाहून सर्वच अक्षरशः अवाक झाले,

रिंकूने अतिशय कठिण परिस्थितीत जबरदस्त फलंदाजी करताना केवळ 15 चेंडूत घणाघाती 40 धावा करत सामन्यात चुरस निर्माण करत लखनऊच्या तोंडचे पाणी पळवले होते, पण लेविसने तो अप्रतिम झेल घेत सामना पुन्हा लखनऊच्या पारड्यात टाकला,पुढच्याच चेंडूवर उमेश यादवला त्रिफळाचीत करत स्टोयनिसने आपल्या संघाला चित्तथरारक विजय तर मिळवून दिलाच,पण आपल्या संघाची प्ले ऑफ मधली जागाही पक्की करुन टाकली.लखनऊने अंकतालिकेत आता व्दितीय क्रमांक पटकावला आहे तर याचवेळी केके आरचे आव्हान या पराभवाने संपुष्टात आणले आहे,आता त्यांना पुढील वर्षीच संधी मिळेल. नाबाद शतकी खेळी करुन संघाला विजयाच्या वाटेवर नेणाऱ्या डीकॉकला सामन्याचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक
लखनऊ सुपर जायंट्स
नाबाद 210
डिकॉक नाबाद 140,राहुल नाबाद 68
विजयी विरुद्ध
कोलकाता नाईट रायडर्स
8 बाद 208
श्रेयस 50,राणा 42,रिंकू 40,बिल्लिंग 36,नारायण नाबाद 21
स्टोयनिस 23/3,मोहसीन 20/3,बिष्णोई 34/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.