Talegaon Dabhade : ‘स्वातंत्र्यसमर’ महानाट्याच्या प्रवेशिकांचे आदर्श विद्या मंदिरामध्ये वाटप

एमपीसी न्यूज – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त (Talegaon Dabhade) सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठान आयोजित ‘स्वातंत्र्यसमर’ ऐतिहासिक महानाट्याच्या प्रवेशिकांचे वाटप शुक्रवारी (दि.25) आदर्श विद्या मंदिरामध्ये करण्यात आले. या महानाट्यात हिंदुस्थानच्या सशस्त्र क्रांतीचा 950 वर्षाचा इतिहास सादर करणारे प्रयोग येत्या 1 ते 4 डिसेंबरला होणार आहेत.

या ऐतिहासिक महानाट्याचा आनंद शाळेतील विद्यार्थ्यांना होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ही पर्वणी असून प्रवेशिका विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे काम तळेगाव शिक्षण मंडळाचे माजी सभापती व उद्योजक अशोकराव काळोखे यांनी केले आहे.

आदर्श विद्या मंदिरातील माध्यमिक विभागातील अर्थात इ.5 वी ते इ. 10 वी सर्व विद्यार्थी तसेच,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून 850 प्रवेशिकांचा खर्च अशोकराव काळोखे यांनी उचलला असून या महानाट्यासाठी पहिल्या दिवसाचे ते आयोजक ठरले आहेत. यासाठी त्यांनी एकूण पाच लाख रुपयांची भरीव अशी मदत या महानाट्यासाठी केली आहे.

Pune : रामदेव बाबांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुण्यात पतंजली दुकानासमोर काँग्रेसची तीव्र निदर्शने

या महानाट्याद्वारे भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आपल्यासमोर सादर केला जाणार आहे. अलीकडील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य संग्रामाची ओळख असावी. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या अपरिचित क्रांतिकारकांचे कार्य समाजासमोर यावे, या हेतुने ॲड.विनय चंद्रकांत दाभाडे यांच्या संकल्पनेतून या महानाट्याची निर्मिती करण्यात आली. ही संकल्पना साकार करण्यासाठी आपण सर्वजण एकजुटीने पुढे जाऊया, अशी खात्री व विश्वास अशोकराव काळोखे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. सर्व विद्यार्थ्यांनी हे महानाट्य बघावे असे आवाहनही त्यांनी केले.

९५० वर्षाच्या इतिहासात मौर्य साम्राज्ये पतनापासून गोवा मुक्ती संग्रामापर्यंतचा (Talegaon Dabhade) सशस्त्र क्रांतीचा प्रवास आजच्या पिढीला कळावा.यासाठी एक व्यासपीठ मिळावे म्हणून आपण हे शिवधनुष्य पेलले असल्याची ग्वाही महानाट्याचे निर्माते आणि दिग्दर्शक आणि आदर्श विद्यामंदिराचे माजी विद्यार्थी ॲड विनय चंद्रकांत दाभाडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले आणि शाळेच्या संस्थापक मान्यवरांच्या साक्षीने हा उपक्रम सादर करण्यास मिळत आहे हा माझ्यासाठी आशीर्वादच आहे.अशाप्रकारचा आनंदही व्यक्त केला.

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना ज्या क्रांतिकारकांनी प्राणार्पण करून या देशासाठी लढले, त्यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून ॲड. विनय दाभाडे यांनी खरोखरच हे शिव धनुष्य हातात घेतले आहे. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, अशा शब्दात मावळ शिक्षण संस्थेचे सचिव यादवेंद्रजी खळदे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करत या महानाट्याला शुभेच्छाही दिल्या.

PMPML : ‘पीएमपीएमएल’ च्या मुख्य प्रशासकीय इमारतीत ‘संविधान दिन’ साजरा

कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान संस्थेच्यावतीने करण्यात आला. विद्यार्थ्यांना कार्यक्रम अगदी आनंदाने बघता यावा याशिवाय तो विनामूल्यही बघता यावा म्हणून ज्यांनी ह्या प्रवेशिका उपलब्ध करून दिल्या त्यासाठी अशोकराव काळोखे यांचे मनःपुर्वक आभार संस्थेचे खजिनदार नंदकुमार शेलार यांनी मानले. तसेच, या कार्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. ॲड. विनय चंद्रकांत दाभाडे यांचेही आभार व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले नगरसेवक आनंदराव भेगडे यांचेही आभार मानले. सरतेशेवटी सर्व मान्यवरांच्या हस्ते एकूण 850 विद्यार्थ्यांना व शिक्षक व शिक्षकेतरांना प्रवेशिकेचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रकाश शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर बांधवांनी मोलाचे सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.