Pimpri : त्या कुमारी मातेच्या बाळाचा बाप शोधा

महिला अत्याचार विरोधी समितीची पिंपरी पोलिसांकडे मागणी

एमपीसी न्यूज – मजूर कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार केले. त्या कुमारी मातेने मृत बाळाला जन्म दिल्यानंतर बाळाची परस्पर विल्हेवाट लावून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे. आरोपीच्या दहशतीमुळे कुटुंबीय तक्रार देण्यास धजावत नाही. त्यामुळे पोलिसांनी पुढाकार घेऊन त्या नराधमाच्या शोध घ्यावा अशी मागणी पिंपरी – चिंचवड वूमन हेल्पलाईनच्या महिला अत्याचार विरोधी समितीने शनिवारी (दि. 22) पिंपरी पोलिसांकडे केली आहे.

समितीच्या अध्यक्षा नीता परदेशी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आंबेगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर उपचार सुरु आहेत. तिच्यावर बलात्कार झाला असून तिने 21 डिसेंबर रोजी एका मृत मुलाला जन्म दिला आहे. त्या बाळाच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावून प्रकरण दडपण्याचा घाट घातला जात आहे. या प्रकारामुळे मुलीचे कुटुंबीय भेदरले असल्याने ते तक्रार देण्यासाठी समोर येत नाहीत. ही घटना अतिशय गंभीर आहे.

पोलिसांनी पुढाकार घेत त्या मृत बाळाची डि.एन.ए. चाचणी करणे गरजेचे होते. मात्र, पोलिसांनी देखील याकडे दुर्लक्ष केले. अल्पवयीन मुलीने जन्म दिलेल्या बाळाचा बाप शोधण्यासाठी मृत बाळाची डीएनए तपासणी करणे गरजेचे आहे. त्यातून आरोपीचा शोध घेऊन आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.