Ramdas Athawale On Buddha Vihar:अयोध्या येथे भव्य बुद्ध विहारची निर्मिती व्हावी- रामदास आठवले

A Buddha Vihar should be constructed at Ayodhya says Ramdas Athawale प्रख्यात गायक आनंद शिंदे यांनी सर्व दलित नेत्यांनी आपले मतभेद दूर करुन बुद्ध विहारासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

एमपीसी न्यूज- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अयोध्यामध्ये राम मंदिराबरोबरच तिथे बुद्ध विहार निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मंदिर स्थळी एक प्राचीन बौद्ध तीर्थस्थळ होते. त्यामुळे अयोध्या येथे एक भव्य बुद्ध विहार उभारण्याची आवश्यकता असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.

रामदास आठवले पुढे म्हणाले की, राम मंदिर आणि बाबरी मशिदीपूर्वी येथे बुद्ध विहार होते. परंतु, आता सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर निर्मितीला परवानगी दिली आहे. त्याचबरोबर बाबरी मशिदीलाही जमीन दिली आहे. त्यामुळे आम्हाला एक भव्य बुद्ध विहार उभारण्यासाठीही एक भूखंड दिला जावा.

या मागणीसाठी आम्ही लवकरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, प्रख्यात गायक आनंद शिंदे यांनीही ही मागणी केली आहे. सर्व दलित नेत्यांनी आपले मतभेद दूर करुन बुद्ध विहारासाठी एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले. अयोध्येतील त्या ठिकाणी खोदकामावेळी प्राचीन बौद्ध कलाकृती मिळाल्या होत्या. यासाठी दलित नेत्यांनी एकत्र यावे आणि एक संग्रहालय आणि बुद्ध विहाराच्या निर्मितीच्या दिशेने काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रिपाइंचे (गवई गट) प्रमुख राजेंद्र गवई यांनीही अयोध्या धार्मिक सद्भावाचे प्रतीक होईल, असे म्हटले. अयोध्या येथे भारतातील सर्व तीन प्रमुख धर्मांसाठी पूजा स्थळ होईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 ऑगस्ट रोजी राम मंदिरचा शिलान्यास करतील. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.