Chinchwad: आगामी सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू

A preventing order has been imposed in Pimpri-Chinchwad on the backdrop of upcoming festivals

एमपीसी न्यूज- आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश 2 ते 15 जून 2020 या कालावधीत लागू राहणार आहेत.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील कंटेन्मेंट झोनसाठी लॉकडाऊनची मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. शहरात राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद पुकारणे, उपोषण यांसारखी आंदोलने केली जातात.

शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी या आदेशानुसार पुढील 14 दिवस आंदोलनांसह कोणतीही घातक कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.

दि. 3 जून रोजी धर्मवीर संभाजी महाराज जयंती, 4 जून रोजी शिवराज्याभिषेकोत्सव दिन, 5 जून रोजी वटपौर्णिमा, 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा (किल्ले रायगड), 12 जून रोजी संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान-देहू, 13 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान-आळंदी, 14 जून रोजी राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी असे सण उत्सव आहेत.

पुढील 14 दिवस खालील कृत्यांवर बंधने

* कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर बाळगणे

* दगड, शस्त्रे, सोडायची अस्त्रे, फेकायची हत्यारे, साधने, काचेचे तुकडे, काचेच्या रिकाम्या बाटल्या बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे

* शस्त्रे, सोटे, भाले, चाकू, सुरा, कोयता, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका, शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर बाळगणे

* कोणत्याही व्यक्तीचे, चित्राचे, प्रतीकात्मक प्रेताचे, पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे

* मोठमोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजवणे

* सभ्यता, नीतिमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल, राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अविर्भाव करणे. कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे या कृत्यावर बंदी आहे.

* पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास, पोलीस आयुक्तांच्या परवानगीशिवाय सभा घेणे, मिरवणूक काढणे यावर बंदी आहे.

* जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, अंत्ययात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांसाठी लागू राहणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.