Pimpri: म. फुले आरोग्य योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, अपना वतनची मागणी

Take action against private hospitals which do not implement mahatma Phule Jan aarogya Yojana, demand your apna vatan

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड मधील रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी होत नसून या योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, धर्मादाय आयुक्त राजेश जोशी यांच्याकडे शेख यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

या निवेदनात शेख यांनी असे म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

मात्र, शहरातील खासगी रुग्णालयांनी या सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे जे दवाखाने या योजनेची अंमलबजावणी करत नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जावी.

शेख पुढे म्हणाले, राज्यातील सर्वच जनतेला या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. राज्यातील 1000 रुग्णालयांमध्ये नागरिकांना मोफत उपचार घेता येतील असे शासनाकडून सांगण्यात येत आहे.

परंतु प्रत्यक्षात मात्र अजूनही अनेक रुग्णालयांमध्ये या योजनांची अमलबजावणी होताना दिसून येत नाही.

यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये केवळ कोविड – 19 वर उपचार सुरु असल्याने त्याठिकाणी इतर आजार व व्याधी असलेल्या रुग्णांवर उपचार बंद आहेत.

त्यामुळे शहरातील रूग्ण डीवाय पाटील रुग्णालयांमध्ये जातात. परंतु, त्याठिकाणी सुद्धा आवश्यक खाटांची उपलब्धता कमी असल्याने रुग्णांना दाखल करून घेत नाहीत व पैशाअभावी उपचार केले जात नाहीत. दाखल करून घेतले जात नाही.

शहरातील या रुग्णालयातील अशा प्रकारांमुळे कोरोना व्यतिरिक्त इतर आजार असलेल्या नागरिकांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास होत आहे. लॉकडाऊन मुळे कामधंदे बंद असल्याने नागरिकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना त्याना योग्य उपचार मिळत नसल्याने प्रचंड गैरसोय होत आहे.

राज्य शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरामधील खाजगी रुग्णालयावर कडक कायदेशीर कारवाई करावी व कोरोनाच्या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार मिळावेत अशी मागणी अपना वतन संघटनेचे सिद्दीकभाई शेख यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.