Talegaon Dabhade : विजय खिंडीचा प्राथमिक संदर्भ गवसला

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडेमध्ये सोमाटणे फाटामार्गे प्रवेश करताना लागणाऱ्या खिंडीस आजवर अनेक नावांनी संबोधले गेले. यात तळेगाव दाभाडेची खिंड, सोमाटणेची खिंड आणि नॅशनल हेवीची खिंड अशी अनेक नावे असल्यामुळे खरे नाव समोर असून विस्मृतीत गेले होते.

सकाळी चौराई दर्शनासाठी जात असताना परिघातील काही भक्तांना दगडी अवशेष निदर्शनास आले. बजरंग दल मंत्री संदेश भेगडे, दुर्गसंवर्धक सदानंद पिलाने, वन्यजीव रक्षक संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे, सचिन ढमाले, किरण पगारे, आदित्य येवले, संकल्प भेगडे, विठ्ठल भेगडे,  कुंदन भोसले, रोहिदास कोळी आदींनी इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी प्रत्यक्ष स्थलचिकित्सा केली असता यातून अवशेष माध्यमातून खिंडीचा नव्याने इतिहास समोर आला आहे.

ब्रिटिश भारतात व्यापारी उद्देशाने आले मात्र येथील राजकीय पोकळी लक्षात आल्यावर स्वार्थ आणि लालसी वृत्तीने त्यांनी आपल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य हिरावून पारतंत्र्यात टाकले. भारतीय लोकांना हीन दर्जाची वागणूक देवून येथील संपत्ती ब्रिटिशांनी हिरावून घेतली. यावर दादाभाई नौरोजी यांनी “The Unbritish Rule in India” हा ग्रंथ लिहून त्यात संपत्ती निस्सारण सिद्धांत मांडला.

ब्रिटिशांना संपूर्ण भारतात कडवा विरोध मराठ्यांनी केला आणि प्रत्यक्ष मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील खिंडीत झालेल्या युद्धात शेकडो ब्रिटिशांना मराठ्यांनी यमसदनी पोहोचवले. यात महादजी शिंदे आणि बालाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना विजय मिळाला. याचे प्रतीक म्हणून या खिंडीत हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना करून त्यास विजय मारूती असे नामकरण करण्यात आले. तसेच एक विजयस्तंभ पूर्वी येथे बांधण्यात आला होता आणि कालौघात पडझड झाल्याने तो विस्मृतीत गेला. मात्र त्याचे भग्नावशेष आज नव्याने समोर येत असल्याने येथे मराठ्यांच्या या विजयाचे स्मारक होते हे सिद्ध होत आहे. पुढील पिढ्यांनी देशभक्त बनण्यासाठी या स्मारकाची त्वरित उभारणी आवश्यक आहे.

तळेगाव दाभाडे मधील नागरिकांनी, संस्था आणि देशप्रेमी संघटनांनी या स्मारकाचे पुनरुज्जीवन करणे तसेच या खिंडीला विजयखिंड असे संबोधले जाणे अभिप्रेत आहे. नव्याने समोर आलेल्या या भग्न अवशेषांतून असे निदर्शनास येते की, इथे झालेल्या युद्धात अनेक ब्रिटिश मारले गेले. हा विजय मराठी साम्राज्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होता याप्रीत्यर्थ विजयाचे स्मारक उभारून कायमस्वरूपी दिवाबत्तीचे काम होत असावे. सदर उपलब्ध झालेला भाग दीपमाळेच्या वरील असून त्यास मध्ययुगीन वारसा आहे. त्याचे जतन करून येथे विजयस्मारक उभारले जावे. तसेच राष्ट्रप्रेमी संघटनानी व नागरिकांनी ९ जानेवारी १७७९ रोजी झालेल्या या युद्धाचे स्मरण म्हणून तळेगाव दाभाडेत एक भव्य सांस्कृतिक विजयोत्सव सुरू होणे अपेक्षित आहे.

इतिहास संशोधक डॉ. प्रमोद सोमनाथ बोराडे

९८२२७१७४४७ / ९९७५३३५०२९  

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.