Dehuroad : कुंडमळा बघायला गेलेली तरुणी इंद्रायणी नदीत बुडाली; शोधकार्य सुरू

एमपीसी न्यूज – देहूरोड शेलारवाडी जवळ असलेल्या इंद्रायणी नदीतील कुंडमळा बघायला गेलेली तरुणी पाय घसरून नदी पात्रात पडली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पोहता न आल्याने तरुणी वाहून गेली. ही घटना रविवारी (दि. 8) दुपारी घडली. शालिनी चंद्राबालन (वय 17, रा. आकुर्डी) असे वाहून गेलेल्या तरुणीचे नाव आहे. एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने अद्यापपर्यंत शोधकार्य सुरू आहे. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शालिनी तिच्या भाऊ आणि बहिणीसोबत रविवारी इंद्रायणी नदीतील कुंडमळा बघायला आली. नदीपात्राच्या बाजूने फिरत असताना शालिनीचा अचानक पाय घसरला आणि ती नदीपात्रात पडली. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने ती त्या प्रवाहात पोहू शकली नाही. तिला वाचविण्यासाठी तिचे भाऊ-बहीण देखील पाण्यात उतरले परंतु पाण्याच्या प्रवाहात ते दोघेही वाहून जाऊ लागले. आसपास असलेल्या लोकांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी भाऊ आणि बहिणीला पाण्याच्या बाहेर काढले. मात्र, शालिनी कुठेही आढळून आली नाही. तात्काळ एनडीआरएफच्या जवानांना बोलवण्यात आले. रविवारी दुपारपासून शोधकार्य सुरू आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.