Pimpri News : राज्य सरकारकडून घरेलू कामगारांची फसवणूक; ‘आप’चा आरोप

एमपीसी न्यूज – घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ अस्तित्वात नसताना नोंदणी का केली जातीये, जर कसलाही लाभ भेटणार नसेल तर मग पैसे का घेताय असे अनेक प्रश्न उपस्थित करत राज्य सरकार घरेलू कामगारांची फसवणूक करत आहे, असा आरोप आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवडचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केला आहे.

बेंद्रे म्हणाले, आम आदमी पार्टीने पुणे जिल्ह्यामध्ये एप्रिल 2021 पासून घरेलू कामगार नोंदणी प्रक्रिया कामगार कल्याण विभागात करायला सुरूवात केली. 2000 पेक्षा अधिक अर्ज एप्रिल आणि मे महिन्यात कामगार कल्याण विभाग, वाकडेवाडी येथे वर्ग केले. पण ह्या 2000 अर्जांची छाननी देखील कामगार कल्याण विभागाने केलेली नाही. जुलै 2021 मध्ये 76 घरेलू कामगारांचे अर्ज छाननीनंतर स्वीकारून कामगार कल्याण विभागाने प्रत्येक महिलेकडून रु. 120 जमा करून घेतले.

20 रुपये नोंदणी फी आणि 5 रुपये प्रती महिन्याप्रमाणे डिसेंबर 2022 पर्यंत सभासद फी असे हे 120 रुपये होतात. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ या नावाने रितसर पावत्या देण्यात आल्या. पुढील अर्जांची छाननी संथ गतीने होत असल्यामुळे, ऑगस्ट 2021 मध्ये उपायुक्त कामगार कल्याण गीते पुणे यांच्या भेटीदरम्यान असे समजले की सध्याच्या परिस्थितीत घरेलू कामगारांना कुठल्याही प्रकारची मदत/ अनुदान जाहीर करण्यासाठी घरेलू कामगार मंडळ अस्तित्वातच नाही.

ही धक्कादायक बाब समजताच अपर आयुक्त शैलेंद्र पोळ यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत पोळ साहेबांकडून सांगण्यात आले की त्यांच्या पुण्यातील कार्यालयाला घरेलू कामगारांचे पैसे स्वीकारण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचे अनुदान देण्याचा त्यांना अधिकार नाही.

त्यासंदर्भात परळ येथील उपसचिव कार्यालयाशी संपर्क करावा असे सुचवले. सप्टेंबर 2021 मध्ये उपसचिव दादासाहेब खताळ यांच्याशी दूरध्वनी संपर्क केला असता सांगण्यात आले की 2014 ला घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ हे बरखास्त करण्यात आले होते. 2014 पासून कल्याणकारी मंडळ अस्तित्वात नसल्याने कुठल्याही प्रकारचे अनुदान, मदत सध्याच्या परिस्थितीत देणे अशक्य आहे असे सांगितल्याचे बेंद्रे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.