Pimpri News : ‘रुपी’च्या ठेवीदारांना नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोठे ‘गिफ्ट’; सारस्वत बँकेने खातेदारांसह विलीनीकरणाची दर्शविली तयारी

एमपीसी न्यूज – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शेकडो ठेवीदारांचे पैसे अडकलेल्या रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे खातेदारांसह विलिनीकरण करून घेण्याची सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने तयारी दर्शविली आहे. याबाबत सारस्वत बँकेने केवळ रुपी बँकेच्या प्रशासक मंडळासमोरच नव्हे तर आरबीआयसमोर विलीनीकरणाचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे ‘रुपी’च्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच त्याची प्रक्रिया सुरू होईल, असा विश्वास यासाठी पाठपुरावा करणारे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी व्यक्त केला. ‘रुपी’च्या ठेवीदारांना नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोठे गिफ्ट मिळाल्याचेही ते म्हणाले.

रुपी बँकेचे विलिनीकरण किंवा बँक सुरु करण्यासाठी न्यायालयापासून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यापर्यंत सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या नगरसेवक संदीप वाघेरे यांना मोठे यश मिळाले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात रुपी को-आपरेटिव्ह बॅकेचे शेकडो खातेदार व ठेवीदार आहेत. त्या माध्यमातून सुमारे 1 हजार 297 कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत आहेत. सुमारे आठ वर्षांपूर्वी विविध कारणांमुळे रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेवर निर्बंध लादले होते.

त्यामुळे खातेदार, ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. गेली आठ वर्षे बँक विलीनीकरणाच्या फेऱ्यात अडकली होती. रुपी बँकेची आर्थिक परिस्थिती चांगली असून बँक चालू होऊ शकते. बँक चालू करण्याची परवानगी देण्यासाठी नगरसेवक संदिप वाघेरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयानेही बँकेचे विलीनीकरण किंवा पुनर्जीवन करण्याबाबत निर्णय घ्यावा असे सांगितले होते.

नगरसेवक संदीप वाघेरे यांनी सात दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचीही भेट घेतली होती. रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे म्हैसाळा को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये अथवा इतर सहकारी बँकेत विलिनीकरण करण्याची विनंती वाघेरे यांनी केली होती. त्यावर रुपी बँकेचे सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेत विलिनीकरण करण्याबाबत सारस्वत बँकेचे संचालक गौतम ठाकुर यांच्याशीही चर्चा झाली होती.

त्यांनी देखील रुपी बँकेचे विलिनीकरण करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. मी पुन्हा त्यांच्याशी चर्चा करतो असे अर्थराज्यमंत्री डॉ. कराड यांनी सांगितले होते. त्यानंतर अवघ्या सहाच दिवसांत अतिशय वेगाने सूत्रे हलली. सारस्वत बँकेने रुपी बँकेचे खातेदारांसह विलीनीकरण करून घेण्याची तयारी दर्शविली. सारस्वत बँकेने केवळ रुपी बँकेच्या प्रशासक मंडळासमोरच नव्हे तर आरबीआयसमोर विलीनीकरणाचा प्रस्ताव ठेवला आहे, असे वाघेरे यांनी सांगितले. या प्रस्तावामुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रुपी बँकेच्या विलीनीकरणानंतर खातेदारांचे व्याज, डिपॉझिटही मिळणार – संदीप वाघेरे

नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक कष्टकरी, गोरगरीब नागरिकांचे रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेत पैसे अडकले आहेत. गेली आठ वर्षे रुपी बँक विलीनीकरणाच्या फेऱ्यात अडकली आहे. त्यामुळे बँकेच्या अनेक ठेवीदारांच्या समोर आर्थिक अडचण उभी राहिली आहे. आता बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्याने बँक पुनरुज्जीवीत होऊ शकते.

बँकेचे विलिनीकरण व्हावे किंवा पुन्हा सुरु करावी यासाठी न्यायालयीन लढाईपासून सर्व स्तरावर मी प्रयत्न करत होतो. यासाठी मागील आठवड्यात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेतली होती. त्यांना ठेवीदारांच्या अडचणी सांगितल्या होत्या. त्यांनी बँकेच्या विलिनीकरणाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. बँकेचे विलिनीकरण किंवा बँक सुरु करण्यासाठी सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.

त्यानंतर सहाच दिवसांनी सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने रुपी बँकेचे खातेदारांसह विलिनीकरण करून घेण्याची तयारी दर्शविली आहे. खातेदारांचे व्याज, डिपॉझिटही देणार आहे. परिपूर्ण अभ्यास करून हा निर्णय घेतल्याचे सारस्वत बँकेचे संचालक गौतम ठाकुर यांनी सांगितले. 1 लाखापेक्षा जास्त गुंतवणूकदाराला आणि 15 वर्षापर्यंत गुंतवणूक केलेल्या खातेदारांना पूर्ण सहकार्य केले जाणार आहे.

त्याचबरोबर 5 लाखापेक्षा जास्त रक्कम असलेल्याना 6 टक्के प्रमाणे योग्य तो परतावा देणार आहेत. यामुळे रुपीच्या खातेदारांनी सुटकेचा मोठा श्वास सोडला. बँकेच्या विलिनीकरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल आणि खातेदारांना दिलासा मिळेल असा विश्वास नगरसेवक संदीप वाघेरे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.