Pune : जागतिक मधुमेह दिनानिमित्त आदित्य बिर्ला हॉस्पिटलतर्फे शहरात मोफत रक्तशर्करा तपासणी शिबिर 

एमपीसी न्यूज – जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यासाठी पुणे येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलतर्फे 14 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत मोफत रक्तशर्करा  (ब्लड शुगर) तपासणी शिबिर आयोजित केले आहे. आदित्य बिर्ला अट्रियममध्ये हे शिबिर होणार आहे.

जवळपास 15 हून अधिक ठिकाणी 14 नोव्हेंबर रोजी या सुपर स्पेशालिटी हेल्थकेअर सुविधेतर्फे रॅण्डम रक्तशर्करा तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. डांगे चौक, हिंजेवाडी चौक, पिरंगुट चौक, बाणेर चौक (बालेवाडी फाटा), परिहर चौक येथील विधाते वस्ती, चतु:श्रुंगी चौक, एफ सी कॉलेज रोड, ढोले पाटील रोड (रुबीजवळ), एरंडवणे (डीएमएच हॉस्पिटलजवळ), कर्वे रोड (सह्याद्री रुग्णालयाजवळ), भोसरी (संत ज्ञानेश्वर चौकाजवळ), चिंचवड (मोरया चौकाजवळ), निगडी (भेळ चौकाजवळ) या ठिकाणांचा यात समावेश आहे. याशिवाय, महिंद्रा अँड महिंद्रा, क्वाड्रॉन बिझनेस पार्क, ब्लू रिज, एम्बसी टेक झोन सीआयटी या कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही हा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या सीईओ रेखा दुबे म्हणाल्या, मधुमेहाचे योग्य वेळी उपचार केले नाहीत, तर अनेक अल्पकालीन वा दीर्घकालीन रोग उद्भवू शकतात. या आरोग्य तपासणी शिबिरांच्या माध्यमातून, पुण्यातील लोकांना मधुमेहाचा प्रतिबंध आणि मधुमेहातील गुंतागुंत याबाबत आम्ही जागरुक करणार आहोत. आमच्या तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांच्या मदतीने सकाळी 10 वाजल्यापासून ही शिबिरे सुरू होतील. मधुमेहतज्ज्ञ, एण्ड्रोक्रायनोलॉजिस्ट आणि फिजिशियन यांच्या कन्सल्टेशनवर 50 टक्के आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरी सल्ल्यानुसार, पॅथोलॉजिकल तपासण्यांसाठी 20 टक्के सवलत आम्ही देणार आहोत.

त्या पुढे म्हणाल्या, इतक्या वर्षांच्या अनुभवांती आमच्या असे लक्षात आले आहे की, समस्या आहाराविषयी असो, व्यायामाविषयी असो, धूम्रपानाविषयी असो किंवा मद्यपानाविषयी असो, रुग्ण व डॉक्टर यांच्यात योग्य संवाद असेल, तर या समस्या व्यवस्थापित करणे सोपे जाते. “मधूमेहाला तुम्ही जितके समजून घ्याल, तितके तुम्ही सुरक्षित असाल”, यावर आमचा विश्वास आहे.

आदित्य बिर्ला हॉस्पिटल, पुणे येथील वैद्यकीय संचालक डॉ. राजशेखर अय्यर म्हणाले, मधुमेह शरीराच्या संपूर्ण यंत्रणेवर परिणाम करतो आणि अनेक गुंतागुंतीचे आजार यातून उद्भवू शकतात. भारतात बेशिस्त जीवनशैली, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, तणाव आणि स्निग्धांश, साखर व कॅलरींचे अतिरिक्त सेवन यामुळे मधूमेहाचे प्रमाण खूप आहे, असे विविध अभ्यासांतून सिद्ध झाले आहे. मधूमेह जितक्या लवकर लक्षात येईल, तितकी गुंतागुंत लवकर रोखता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.