Pune : पंतप्रधानांच्या घोषणेनंतर मेट्रो अधिकाऱ्यांची धावपळ

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर महामेट्रोने वनाज ते गरवारे महाविद्यालय हा साधारण ५ मेट्रो किलो मीटरचा मार्ग आणि पिंपरी-चिंचवड ते दापोडी हा ६ मेट्रो किलोमीटरचा मार्ग प्राधान्य देऊन सुरू केला आहे. यातील पिंपरी चिंचवड ते दापोडी या मार्गचे ६५ ते ७० टक्के काम पूर्ण झाले असून पहिल्या टप्यात या मार्गावरील फुगेवाडी आणि संत तुकारामनगर येथील स्टेशन सुरू करण्यात येणार आहेत. तर, वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गाचे देखील ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

या मार्गावर आनंदनगर व गरवारे कॉलेज ही स्टेशन सुरवातीला कार्यान्वयीत होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली वेळ गाठण्यासाठी मेट्रो प्रशासनाची धावपळ सुरू आहे. मात्र, त्यासाठी मेट्रोला पुढील दीड महिन्यात उर्वरित ३५ टक्के काम पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे मेट्रोकडून जानेवारीमध्ये ट्रायल रान घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मेट्रो रिच १ व रिच २ चे प्रकल्प अधिकारी गौतम बिर्‍हाडे यांनी आज दिली.

पुण्यात मेट्रोला सर्वत्र मागणी होत आहे. शहरात चारही बाजूंनी वाहतुकीची कोंडी होते. त्यासाठी मेट्रो गरजेची असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, कर्वे रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्याचा तासनतास कोथरूडकारांना सामना करावा लागत आहे. तसेच कर्वे रस्ता आणि पौड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे, ते बुजविण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.