Chakan News : यासाठी केली स्मशानभूमीत अघोरी पूजा, पण गावकरी आल्याने काढला पळ

सहा जणांवर गुन्हा; दोघांना अटक

एमपीसी न्यूज :  कुटुंबाच्या आर्थिक आणि इतर अडचणी सोडविण्याचे अमिश दाखवून सहा जणांनी मिळून एका व्यक्तीकडून 5 लाख 13 हजार रुपये घेतले. भोसे गावातील स्मशानभूमीत अनिष्ट प्रथा असलेली अघोरी पूजा केली. गावकऱ्यांनी याबाबत विचारणा करताच पूजा करणारे पळून गेले. ज्या व्यक्तीकडून लाखो रुपये घेतले, त्याची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार ऑक्टोबर 2020 पासून 29 जानेवारी 2021 या कालावधीत खेड तालुक्यातील भोसे गावातील स्मशानभूमीत घडला.

आनंद सुरेंदर जैन (वय 35, रा. हैदराबाद) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साधुबाबा चंद्रकांत नायर, बाळासाहेब मारुती मोहिते (रा. भोसे), नरेंद्र हनुमंत गायकवाड (वय 52, रा. पिंपरी), गणेश मारुती चव्हाण (वय 38, रा. भोसरी) आणि त्यांच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नरेंद्र आणि गणेश या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जैन यांच्या आर्थिक आणि इतर अडचणी तांत्रिक व अनिष्ट पूजेद्वारे जादूटोणा करून सोडवतो असे आरोपींनी जैन यांना फोनद्वारे आणि समक्ष भेटून वारंवार सांगितले. जैन यांना आरोपींनी तांत्रिक व्हिडीओ दाखवले. मंत्र केलेले कुंकू देऊन जैन यांच्या घरी जाऊन होम हवन देखील आरोपींनी केले.

त्यातून जैन यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी पैशांची मागणी करून जैन यांच्याकडून 5 लाख 13 हजार रुपये घेतले. त्यानंतर 29 जानेवारी रोजी रात्री दीड वाजता भोसे येथील स्मशानभूमीत आरोपींनी एक अघोरी पूजा केली. त्यावेळी भोसे येथील स्थानिक नागरिकांना याची शंका आली. नागरिकांनी आरोपींना पूजा करण्याबाबत विचारणा केली असता सर्व आरोपी स्मशानभूमीतून पळून गेले.

आपल्या अंगात अतिद्रियशक्ती असल्याचे आज कामक्या देवी गोहाटी येथील कपाल अघोरी मठात 25 वर्ष शिक्षा ग्रहण केल्याचे आरोपींनी जैन यांना सांगितले होते. त्याद्वारे जैन यांच्याकडून 5 लाख 13 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली.

याबाबत महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालणेबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे 3 (1), (2), (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.